देशातील साखरटंचाई आणि साखरेच्या दरातील चढउतार टाळण्यासाठी केंद्र सरकारने ६ डिसेंबर २०२३ रोजी उसाचा रस आणि बी-हेवी मोलाईसेस (मळी) पासून इथेनॉल उत्पादन आणि खरेदीवर बंदी घातली होती.
सर्वप्रथम राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने या सर्व बाबी व त्याचे गांभीर्य तातडीने केंद्र शासनाच्या नजरेस आणले आणि त्याच्या फलस्वरूप केंद्राने १५ डिसेंबर २०२३ च्या सुधारित आदेशाद्वारे शिल्लक इथेनॉल आणि काही प्रमाणात बी हेवी मळी याचा इथेनॉल वापरासाठी परवानगी देऊन देशभरातील आसवनी प्रकल्प असणाऱ्या साखर कारखान्यांना अंशतः दिलासा दिला.
केंद्राने ही बंदी घातली त्या वेळी देशभरात सुमारे पाच ते सात लाख टन मळीचा (बी- हेवी मोलाईसेस) साठा शिल्लक होता. त्याचे वेळीच इथेनॉलमध्ये रूपांतर केले झाले नाही तर हा साठा वाया जाणार आहे. याची उपयोग संपण्यापूर्वी इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्याची विनंती राज्य साखर संघ आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने पंतप्रधान यांच्याकडे केली होती.
त्याच्या परिणामस्वरूप केंद्र शासनातील संबंधित मंत्रालयीन विभागांमध्ये तातडीने हालचाली सुरु झाल्या आणि दिनांक २४ एप्रिल रोजी केंद्र शासनाकडून सुमारे ७ लाख टन शिल्लक बी हेवी मळीचा वापर इथेनॉलकडे करण्याचा परवानगी देण्यात आली असून आसवानी निहाय ३१ मार्च अखेरच्या बी हेवी मळीच्या मात्रेतून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे पारित होण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.
पहिल्या टप्प्यात ६६ कोटी लिटर इथेनॉल खरेदी करणारदेशातील साखर हंगाम संपल्यानंतर आता हे निर्बंध हटविण्यात आले असून देशभरात कारखान्यांकडे शिल्लक असलेल्या ऊस रस आणि मळीपासून तयार होणारे इथेनॉल खरेदी करण्याचे आदेश पेट्रोलियम कंपन्याना दिले आहेत. विविध तेल कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे ६६ कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे.
३१ मार्च (मार्च, एप्रिल, मे तिमाही) अखेरच्या बी हेवी मळीच्या मात्रेतून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी पेट्रोलियम मंत्रालयाने करावी अशी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची मागणी होती. पण केंद्र सरकारने दिलेल्या परिपत्रकात (ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर तिमाही) तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी पेट्रोलियम मंत्रालय करणार आहे. तसेच सध्या पेट्रोलमध्ये १२% इथेनॉल मिश्रण केले जाते ते या वर्ष अखेर १५% पर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. - प्रकाश नाईकनवरे व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली