कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ म्हणजेच एनसीसीएफ आणि नाफेडने राज्यात कांदा खरेदीला सुरुवात केली असून, प्रत्येकी एक लाख याप्रमाणे दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सरासरी २६२३.७० प्रतिक्विंटलप्रमाणे भाव दिला जाईल, अशी माहिती एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा (दिल्ली) यांनी नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
देशातील ६५ ते ७० टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून खरेदी केला जाणार असून नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आदी लगतच्या जिल्ह्यांतून खरेदी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून कांदा घेताना एनसीसीएफ किंवा नाफेडलगतच्या मार्केट कमिटीमधील बाजारभावाच्या सरासरीने भाव शेतकऱ्याला दिला जाणार आहे. त्यामुळे कमी भाव मिळतो, ही ओरड शेतकऱ्यांची राहणार नाही, असेही चंद्रा यांनी सांगितले.