Join us

आंब्याला अजून मोहोर नाही; कसे कराल बागेचे नियोजन?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 4:43 PM

हिवाळी हंगामाला सुरुवात झाल्याने आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडल्याने बागायतदारांना मोठा फटका बसला.

हिवाळी हंगामाला सुरुवात झाल्याने आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडल्याने बागायतदारांना मोठा फटका बसला. पाऊस पडल्यापासून ढगाळ वातावरण असल्याने आणि थंडीच गायब झाल्याने मोहर येत नाही. या वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने अनेक फवारण्या कराव्या लागत आहेत. यामुळे हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता असून, बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मागील दोन-चार वर्षांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. परंतु, यावर्षी आंबा पिकाला चांगला मोहर येईल, अशी अपेक्षा होती. सुरुवातीपासून थंडी उत्तम प्रकारे पडली होती. वातावरणही पोषक होते. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न मिळेल, असा शेतकऱ्यांना विश्वास होता. परंतु, अचानक पावसाने सुरुवात केल्याने आंबा पिकाला फटका बसला.

फवारणीचा खर्च वाढला- कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे आवश्यक थंडी पडत नाही. त्यामुळे मोहर पाहिजे त्या प्रमाणात येत नाही.- किडीचे व बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढले आहे. फवारण्या करून काही ठिकाणी मोहोर आला आहे. त्यामुळे फवारणी सुरू आहे.

दरवर्षी वातावरणात बदल घडत आहेत. त्यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होत असते. जर कृषी विभागाने शेतकऱ्यांना किडी व रोग नियंत्रण करण्यासाठी योग्य असे प्रशिक्षण घेतले तर काही प्रमाणात नुकसान टळू शकेल. - चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ

अवकाळी पाऊस पडल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. वातावरणामध्ये बदल झाल्याने कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढत गेला आहे. आजपर्यंत तीन वेळा फवारणी केली तरी किडीचा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होत नाही. थंडी नसल्याने मोहर सुद्धा निघाला नाही. अगोदर १० टक्के निघालेला मोहोर कीड व रोगांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण होत नसल्याने तोही गळून पडत आहे. - विजय घरत, आंबा उत्पादक शेतकरी

ढगाळ वातावरणामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के तीन मिली किंवा ब्युफ्रोफेझीन २० टक्के प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाण्यात आणि भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल ५ मिली पाण्यात किंवा पाण्यात विरघळणारे गंधक ८० टक्के २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. नियंत्रण नाही झाल्यास आलटून पालटून फवारणी करावी. शेतकऱ्यांना कृषी विभाग वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे. - मिलिंद चौधरी, जिल्हा कृषी विकास अधिकारी

टॅग्स :आंबाहवामानफळेशेतकरीशेतीपीक