अफरोज पठाणकर्जत : अतिवृष्टी, ढगाळ हवामानाचा फटका यंदा इतर पिकांबरोबरच कर्जत तालुक्यातील उडीद पिकालाही बसला आहे. यामुळे उडदाचा रंग बदलला असून, उत्पादनातही घट झाली आहे.
एकरी पाच ते सहाच क्विंटलचे उत्पादन मिळत आहे. नव्या उडदाला बाजारात सात ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटलचाच भाव मिळत आहे. तो हमीभाव इतकाही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
यावर्षी हंगामाच्या सुरुवातीच्या काळातच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कर्जत तालुक्यात खरीप पिकांची पेरणी वेळेवर झाली. उडीद, तूर, मका, बाजरी, कापूस, मूग, भुईमूग, सूर्यफूल या पिकांना शेतकऱ्यांनी पसंती दिली.
तालुक्यात सर्वाधिक पेरणी उडदाची झाली. १९ हजार ६३८ हेक्टरवर उडीद पेरला गेला. योग्यवेळी पाऊस आल्याने मुगाची उगवणही चांगली झाली होती. मात्र मागील महिन्यात अतिवृष्टी, जोरदार पाऊस, ढगाळ हवामान याचा फटका उडीद पिकास बसला.
किडीचा प्रादुर्भाव झाला. उडीद पिवळे पडले त्यामुळे उडदाचा रंग बदलला. त्यामुळे एकरी उत्पादन पाच ते सहा क्विंटल इतके निघाले. एरवी ते अगदी दहा क्विंटलपर्यंत मिळते. यंदा हमीभाव ८ हजार ३०० रुपये आहे. मात्र सरासरी सात ते साडेसात हजारांचा भाव मिळत आहे.
अनेकांचा उडीद घरातचउडीद पिकास यंदा सरासरी एकरी खर्च जवळपास १४ हजाराच्या आसपास गेला. यामध्ये १ हजार ५०० प्रतिएकर बियाणे, २ हजार ५०० खुरपणी मजुरी खर्च, खत २ हजार ५००, फवारणी १ हजार २००, काढणीस ५ ते ६ हजार, एक क्विंटल उडीद सोंगणीस ७०० रुपये दर घेतले जातात. यंदा दर कमी मिळाल्याने अपेक्षित पैसे मिळत नाहीत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी उडीद विक्री न करता घरातच ठेवला आहे. यंदा हमीभाव केंद्र सुरू झालेले नाही, असे शेतकरी शैलेश अडसूळ यांनी सांगितले.
अन् शेंगा कमी लागल्याउडीद पेरणीनंतर उगवण व पानांची वाढही चांगली झाली. मात्र अतिवृष्टी आणि ढगाळ हवामानामुळे शेंगा कमी लागल्या. जेथे शेंगा लागल्या तेथे कीड आणि ओलीमुळे उडदाचा रंग बदलला. यामुळेही कमी भाव मिळत असल्याचे शेतकरी राहुल जाधव यांनी सांगितले.