Join us

संगणक परिचालकांचा करार संपला; ग्रामपंचायतची ऑनलाइन सेवा झाली ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 9:52 AM

ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या संगणक परिचालकांचा ग्रामविकास विभागासोबतचा करार संपुष्टात आल्याने ग्रामपंचायतींची ऑनलाइन सेवा १ ऑगस्टपासून ठप्प झाली आहे. यामुळे ग्रामपंचायतीमधून विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळण्यास ग्रामस्थांना अडचण निर्माण झाली आहे.

रऊफ शेख

ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या संगणक परिचालकांचा ग्रामविकास विभागासोबतचा करार संपुष्टात आल्याने छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यातील ८६० ग्रामपंचायतींची ऑनलाइन सेवा १ ऑगस्टपासून ठप्प झाली आहे. यामुळे ग्रामपंचायतीमधून विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळण्यास ग्रामस्थांना अडचण निर्माण झाली आहे.

ही प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांना ग्रामस्थ परेशान करीत असल्याने ते कार्यालयात बसत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

जिल्ह्यात एकूण ८६० ग्रामपंचायती आहेत. अनेक ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत असल्याने यात संगणक परिचालकांची संख्या ८२० आहे. ग्रामपंचायतीचा कारभार सुलभ, पारदर्शक व्हावा, याकरिता २०१६ मध्ये राज्य सरकारने ग्रामपंचायतीचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेऊन ग्रामविकास विभागाच्या वतीने सीएससी कंपनीच्या माध्यमातून संगणक परिचालकांची कंत्राट पद्धतीनुसार नियुक्ती केली होती.

त्यानंतर ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत सुरू झाले. हे कामकाज सुरू असताना संगणक परिचालकांचा शासनासोबत केलेला करार १ जुलै रोजी संपुष्टात आला. मागील काही दिवस परिचालकांनी गावकऱ्यांना मोफत सेवा दिली होती. परंतु आता ही सेवा बंद झाली आहे.

ही प्रमाणपत्रे मिळण्यास अडचण

ग्रामपंचायतीमधून नागरिकांना नमुना ८ उतारा, रहिवासी, जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी प्रमाणपत्र यासह विकासकामाची ऑनलाइन माहिती भरणे अशी महत्त्वाची कामे ठप्प झालेली आहेत. याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या कामकाजावर झालेला आहे.

संगणक परिचालकांचा करार संपल्याने ग्रामपंचायत कार्यालयातील ऑनलाइन कामकाज पूर्णपणे बंद आहे. यामुळे ग्रामस्थ आपल्या कामाकरिता कार्यालयात येऊन तगादा लावत आहेत. ग्रामविकास विभागाने पर्यायी व्यवस्था करावी. - शिवाजी खरात, ग्रामपंचायत, बोरगाव अर्ज.

सरकारने संगणक परिचालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी लवलकर समिती गठित केली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला. त्यानुसार ग्रामपंचायतमध्ये पद निर्माण करून संगणक परिचालकांना नियुक्ती देण्याचे सूचित करण्यात आले होते. परंतु त्याची अजूनही अंमलबजावणी झाली नाही. - विजय वाघ, जिल्हाध्यक्ष, संगणक परिचालक, संघटना.

टॅग्स :ग्राम पंचायतऔरंगाबादमराठवाडाशेतीशेती क्षेत्रग्रामीण विकाससरकार