रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणात आंबा उत्पादनाचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. मात्र, फयान वादळानंतर जिल्ह्यातील आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत चालले आहे.
परिणामी बागायतदारांची आणि पर्यायाने जिल्ह्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. त्यामुळे हवामानातील बदल हेच हापूसवरील नवे संकट आहे.
यावर्षी एकूणच आंबा उत्पादन ३० ते ३५ टक्के होते. त्यातच अवकाळी पावसाचा फटका बसल्याने जेमते २० ते २५ टक्केच आंबा हातात येईल असे चित्र आहे. आंबा उत्पादन कमी असले तरी बाजारातील दरसुद्धा समाधानकारक नाहीत.
त्यामुळे खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत होणारा खर्च व तुलनेने मिळणारा दर यामध्ये फरक असल्यामुळे बागायतदारांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे.
फेब्रुवारी, मार्चमध्ये आंबा बाजारात आला तर दर टिकून राहतात. दर टिकले तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघू शकतो. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत खर्च अवाढव्य होतो. स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने आंबा उत्पादनासाठी सध्या नेपाळी व उत्तर प्रदेशातील कामगारांवर अवलंबून राहावे लागत आहे.
आंबा बागायतीचे संरक्षण करण्यापासून कीटकनाशक फवारणी, आंबा काढणी ते वर्गवारी करून पेट्या भरण्यापर्यंतची सर्व कामे नेपाळी, उत्तर प्रदेशातील कामगार करत असल्याने सध्या त्यांना वाढती मागणी आहे.
दोन वर्षांपूर्वी हेच कामगार दहा ते बारा हजार महिना पगारात उपलब्ध होत होते. मात्र, आता महिना वेतन १५ ते १६ हजार रुपयांची मागणी करत आहेत. मजुरी वाढली असली कामगारांची गरज असल्याने बागायतदार वाढीव पगार मोजण्यास तयार होत आहेत, परंतु मजूर मिळत नसल्याने बागायतदारांना स्वतःच कामे करावी लागत आहेत.
महागाईचा परिणाम आंबा पिकावर झाला असून, एका पेटीला दोन ते अडीच हजार रुपये खर्च येत आहे. त्यामुळे बाजारात पेटीला तेवढा दर मिळणे गरजेचे आहे.
वन्यप्राण्यांचा उपद्रवामुळे मोहोर आल्यापासून बागांचे संरक्षण करण्यासाठी नेपाळी राखणी नियुक्त करावे लागतात. त्यामुळे आंबा उत्पादन आले आले किंवा नाही कामगारांना पगार मोजावाच लागतो.
आंबा पेटीचा खर्च (रुपयांत)
लाकडी खोका | १०० ते १२० रु. |
कीटकनाशके | ५०० |
साफसफाई | ५०० |
बाग संरक्षण नेपाळी खर्च | १०० ते १२५ |
वाहतूक खर्च | १५० ते २०० |
फवारणी खर्च | ७५ |
काढणीसाठी मजुरी | १०० |
कराराने आंबा बाग घेताना पेटीला मोजावे लागतात | १०० ते १२५ |
निकष बदलणे गरजेचे
● हवामानावर आधारित फळपीक विमा योजना बागायतदारांना आर्थिक हातभार देणारी असली तरी परतावा कधीच वेळेवर जाहीर केला जात नाही. रक्कमही वेळेवर जमा केली जात नाही. आंबा पीक मे महिन्यापर्यंत असल्याने शासनाने निकष बदलणे गरजेचे आहे.
● बहुतांश ठिकाणचे हवामान मापक यंत्राचे ट्रिगर ॲक्टिव्हेट होत नसल्याने हवामानातील बदलांची नोंद घेण्यास यंत्रणा अपुरी पडते व त्यामुळेही बागायतदारांचे आर्थिक नुकसान होते. ग्रामपंचायतस्तरावर स्वयंचलित हवामान मापक यंत्र बसविण्यास शासनाने मंजुरी दिली असली तरी ते काम अजून प्रलंबितच आहे.
● विमा कंपन्यांनीही निकषात शिथिलता आणणे गरजेचे आहे. गतवर्षी काही महसूल मंडळातील ट्रिगरच ॲक्टीव्हेट न झाल्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले होते.
तुडतुड्यामुळे डाग
● हवामानातील बदलामुळे तुडतुड्याचा प्रादुर्भाव सातत्याने जाणवतो. कीटकनाशक फवारणी करूनही आटोक्यात येत नाही. विद्यापीठामध्ये प्रभावी संशोधन नसल्यामुळेच आतापर्यंत तुडतुडा नियंत्रणासाठी कीटकनाशक उपलब्ध करण्यात आलेले नाही.
● तुडतुडा वेळीच नियंत्रणात न आल्यास फळांवर काळे डाग पडतात. तुडतुडा हा कीटक चिकट द्रव फळ, मोहोरावर सोडत असल्यामुळे मोहोर, फळे काळी पडतात. डाग असलेल्या फळांना योग्य दर मिळत नाही.