तळोदा तालुक्यातील पपई उत्पादकांना यंदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. परिणामी व्यापारी तालुक्यातील शेतकऱ्यांना भूलथापा देत पपई खरेदी करण्यास नकार देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून अनेकांचे पपई उत्पादन झाडावरच लटकून खराब होत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
मोड येथील शेतकरी प्रेमसिंग हिमंतसिंग राजपूत यांच्या सात एकर क्षेत्रात पपईची सध्याची स्थिती दयनीय झाली आहे. पपई तोड करण्यासाठी व्यापारी येत नसल्याने तोड झालेली नाही. यातून व्यापारी येतील आणि पपई तोड सुरू होईल या अपेक्षेने पपई झाडावरच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. व्यापाऱ्यांच्या प्रतीक्षेतील निर्णयाचे फलित म्हणजे पपई झाडावरच सुकत आहे.
व्यापाऱ्याने खरेदीसाठी यावे आणि जो भाव मिळेल तो द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्याची आहे. चार एकरातील या पपईसाठी शेतकऱ्याने सहा लाखांचा खर्च केला आहे. परंतु अवकाळी पावसाने उत्पादन खराब झाल्याचे सांगून व्यापारी अंग काढून घेत आहेत.