वसमत : मागच्या काही दिवसांपासून हळद काढणीस वेग आला आहे. गतवर्षी पेरणी केलेली जुनी हळद (कोचा) वेचल्या जात आहे. त्या कोचाच्या दरात तेजी आली असून कोचाला प्रतिकिलो २०० ते २२० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरासह कुरुंदा व शिरडशहापूर येथे कोचा खरेदीची दुकाने थाटली आहेत. गतवर्षी कोचाचे दर शंभरावर होते. परंतु यंदा कोचा शेतकऱ्यांना पावणार असेच दिसत आहे.
पाण्याची मुबलकता लक्षात घेऊन दोन वर्षांपासून तालुक्यात सर्वाधिक हळद पीक घेतल्या जात आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी हळदीचे विक्रमी उत्पन्न काढतात. फेब्रुवारी अखेरपासून हळद काढणीला वेग आला आहे. यंदा जून महिन्यात सुरुवातीस पाऊस झाला नाही. त्यामुळे हळद उत्पन्नात फटका बसत आहे. सध्या हळदीचे दरात तेजी आली असून बाजार समिती मोंढ्यात बिटात हळदीला सरासरी १६ हजाराचे दर मिळत आहेत.
त्याचबरोबर कोचाच्या दराला चांगलीच झळाळी आली आहे. हळदीमध्ये करक्यूमिन' नावाचा एक घटक आढळतो. यामुळेच हळदीला तिचे औषधी गुणधर्म प्राप्त होतात. करक्युमिन मध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. संशोधनानुसार आपल्या आहारात अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला तर आजार होण्याची शक्यता कमी होते.
हळद काढणीनंतर शेतजमिनीत जुनी हळद निघते, त्यास कोचा म्हणतात. या कोचात करक्यूमिनचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने यास जागतिक स्तरावर मोठी मागणी असते. तालुक्यातील कोचा कर्नाटक, तामिळनाडू यासह आदी राज्यात जात आहे. सध्या कोचाचे प्रतिकिलो २०० रुपयांच्या पुढे दर गेले आहेत. हळद कांडी कोचा प्रतिकिलो १८० ते २०० रुपयापर्यंत जात आहे.
हळद बंडा कोचा प्रतिकिलो २०० ते २२० रुपये प्रमाणे जात आहे. शहरासह तालुक्यातील कुरुंदा व औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे कोचा खरेदी दुकाने थाटली आहेत.
शेतीपूरक जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी
हळद काढणीचा खर्च कोचावर निघेल ....
एकरी हळद काढणीस मजूर १३ हजार रुपये घेत आहेत. हळद दर वाढताच मजुरीही वाढली आहे. दरात तेजी येताच मजुरी दर वाढतो. मंदी आली तरीही मजुरीचे दर काही कमी होत नाही. कोचाचे दर वाढले आहेत. दर असेच राहिले तर हळद काढणी मजुरीला आधार मिळेल. - श्रीराम इंगोले, शेतकरी.
कोचाचे दर वाढले, ही चांगली बाब आहे. हळद काढणी मजुरी व इतर खर्च वरच्या वर निघेल. गतवर्षी कोचाला कोणीही विचारत नव्हते. आता व्यापारी आखाड्यावर येऊन कोचाची मागणी करत आहेत. - बळीराम कदम, शेतकरी.
कोचाचे गतवर्षीपेक्षा वाढले दर ....
यंदा गेल्यावर्षीपेक्षा जास्त दर मिळत आहेत. हळद कांडी कोचास प्रतिकिलो १८० ते २०० रुपये, बंडा प्रतिकिलो २०० ते २२० रुपये दर मिळत आहे. आपल्या भागातील कोचास तामिळनाडू, केरळ, कर्नाटकसह इतर राज्यात मागणी होत आहे. भविष्यात कोचाचे दर वाढतील, असे संकेत आहे. - सय्यद इम्रान, व्यापारी.