पुणे: राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जुलैमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात २९ सप्टेंबरला मदत दिली जाणार आहे.
शेतकरी पुरस्कारांच्या निमित्ताने मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात सुमारे ४२ लाख शेतकऱ्यांना १ हजार ६९० कोटी रुपयांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
त्यात सर्वाधिक ३ लाख ६६ हजार ५९ शेतकरी या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ९२ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ४ हजार १९४ कोटींचा निधी मंजूर केला असून, पहिल्या टप्प्यात २ हजार ५१६ कोटी रुपये यापूर्वीच कृषी विभागाकडे वर्ग केले आहेत.
एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे ६६ लाख शेतकऱ्यांनी आधार क्रमांकासह संमतीपत्र दाखल केले आहे. यापैकी ४१ लाख ९९ हजार ६१४ शेतकऱ्यांचे आधार संलग्न बँक खाते नमो किसान सन्मान योजनेतील माहितीशी जुळविण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजारांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लाभ मिळाला नाही? या गोष्टी तपासा !
■ आधार क्रमांक दिलेल्या उर्वरित २४ लाख शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर लाभ देण्यात येणार आहे. तर, ९२ लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे २६ लाख शेतकरी एकतर या योजनेचा लाभ घेण्यास अनुत्सुक आहेत किंवा त्यांच्या सातबारा उताऱ्यावर नोंद असली तरी त्यांना याबाबत माहिती नाही.
■ या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील पिकांची नोंदणी तलाठ्यांनी एकतर प्रत्यक्षात न करता अंदाजे किंवा गेल्या वर्षाच्या नोंदीच्या आधारे केली आहे. त्यामुळे या नोंदींची सत्यता पडताळणी करणे जिकिरीचे झाले आहे.
■ परिणामी, असे शेतकरी लाभ घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एकट्या सातारा जिल्ह्यातील सुमारे १ लाख शेतकरी सापडत नसल्याचीही वस्तुस्थिती आहे.
लाभ मिळणारे जिल्हानिहाय शेतकरी
अकोला - १,३६,७०७
अमरावती - १,४३,०९७
नगर - २,५८,१०२
कोल्हापूर -३०,१२८
चंद्रपूर - ४७,६६७
संभाजीनगर - २,११,२१६
जळगाव - १,९६,९४८
जालना - ३,२०,०६६
धुळे - ९१,७२५
धाराशिव - २,१०,०१९
नंदूरबार - ४१,१५४
नागपूर - ५२,७२५
नांदेड - ३,१२,९९३
नाशिक - ९५,७०६
पुणे - १८,५११
परभणी - २,९६,६३४
बुलढाणा - २,९६,८५३
बीड - ३,६६,०५९
यवतमाळ - २,०९,६६२
लातूर - २,४४,७१२
वर्धा - ८०,४९१
वाशिम - १,६२,६७०
सांगली - २३,७६२
सातारा - ८९,१०९
सोलापूर - ४९,४१९
हिंगोली - २,११,८३०
सर्वांत कमी लाभ मिळणारे जिल्हे
गडचिरोली - १,१९३
गोंदिया - २
भंडारा - ४५४
एकूण शेतकरी - ४१,९९,६१४
पहिल्या हप्त्यातील २५१६.८० कोटी रुपये स्टेट बँकेकडे जमा करण्यात आले आहेत. त्यातील ४२ लाख शेतकऱ्यांना १ हजार ६९० कोटी रुपयांचे वाटप २९ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढेही लाभ देण्यात येणार आहे. - विनयकुमार आवटे, कृषी विस्तार संचालक, पुणे