Join us

'अनारदाना' असं दिमाखात मिरवणारं डाळिंब भारताला अनेक वर्ष होतं अपरिचित

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 18, 2024 5:04 PM

कसं आलं हे फळ भारतात? काय होता इतिहास? 

'अनारदाना' असं दिमाखात मिरवणारं डाळिंब फळ आखाती देशातलं. इराणमधलं हे पानझडी झूडूप. पण स्पेन, टर्की, इराण, सिरीया असा प्रवास करत करत हे फळ भारतात पाेहोचलं खरं. पण अनेक वर्ष डाळिंब भारतीयांना अपरिचित होतं. ते कधी भारतात आलं? महाराष्ट्रात कसं रुजलं? त्याची ही गोष्ट.

"तडकणाऱ्या फळापासून लांब रहा".. जंगलात शिकारीसाठी गेलेल्या राजा विक्रमादित्याला हा इशारा देणाऱ्या म्हताऱ्याचे शब्द आठवले. कसं असेल हे तडकणारं फळ! असा प्रश्न विक्रमादित्याला पडला होता. या फळाविषयी काहीच माहित नसल्यानं तो सावधपणेच शिकार हेरत होता.

वेताळाला पाठीवर बसवून कसलासा शोध घेणाऱ्या विक्रमाला झाडावर एक माकड दिसलं. हातात लालबुंद फळ घेऊन बसलेलं. उन्हाची तिरीप त्या फळावर पडल्यानं त्या फळावर चमक आली होती. माकडानं खायचा प्रयत्न केला अन् चर्रर्र.. असा आवाज झाला.  आणि क्षणार्धात तीन भागात फळ तडकलं. हे तडकणारं फळ होतं डाळिंब."

विक्रम वेताळाच्या गोष्टीत या फळाचा हा असा उल्लेख होता. जसा विक्रमादित्य राजा अनभिज्ञ होता तसेच आपणही अनेक वर्ष होतो. आता डाळिंब उत्पादनात भारत हा अग्रेसर देश आहे. महाराष्ट्रात डाळिंबाचे ९५ टक्के उत्पादन होते. पण याचा प्रवास फार जूना आहे.

इराणच्या रखरखीत आणि अतिशुष्क जमिनीत तगलेलं हे रसाळ फळ. खरंतर डाळिंबाची लागवड फार प्राचीन. इ.स. पुर्व ३५०० वर्षांपूर्वीपासूनची. इराणमध्ये इस २००० वर्षांपासून शेतकरी या फळाची लागवड करू लागले. शेकडो वर्षांपासून भारत ही जगातील मोठी बाजारपेठ होती. अनेक फिरस्ती देशविदेशांमधून आपल्या प्रांतातल्या खास गोष्टी भारतीय बाजारपेठेत आणण्यास इच्छूक असत. याच काळात भारतात हे फळ आलं.

आता भारत जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा डाळिंब उत्पादक देश आहे. वर्षाकाठी जगात १० लाख टन डाळिंब भारतातून जात असल्याचे वाणिज्य विभागाच्या अहवालात केली आहे.

महाराष्ट्रात हे फळ माहित झालं असावं मोगलकालीन हाजी यात्रेकरूंमुळे. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर भागातील यात्रेकरूंनी येताना आणलेल्या डाळिंबांच्या बियांची रोपं या भागात आणली. आणि कोल्हार या ठिकाणी ती लावली गेली. तिथे हे फळ चांगलं रुजलं. पुढे पुणे जिल्ह्यात आळंदी, जेजूरी भागातल्या शेतकऱ्यांनी ते लावलं.

देशातील फक्त चार राज्यांमध्ये होणारं डाळिंबाचं ९५ टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रातून होतं. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. 

काबूल- कंधार या डाळिंबाच्या मातृदेशातून भारतात विशेषत: महाराष्ट्रात आलेल्या डाळिंबांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये अनेक बदल होत गेले. कोल्हारची मस्कती जातही याच पुढच्या पिढीतली. आळंदी भागात या डाळिंबांची लोकप्रीयता वाढली. फलोत्पादनात प्रयोग करणारे संशोधक डॉ  चिमाजी यांच्या पाहण्यात ती आली १९३० ते ३० च्या काळात. यावर संशोधन करून तयार झालं डाळिंबाचं 'गणेश खिंड' वाण. १९७० नंतर हे वाण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मोठं झालं. राज्यातल्या शेतकऱ्यांनी २५ हजार हेक्टरवर या गणेश खिंड डाळिंबाची लागवड केली. कमी पावसात आणि मध्यम जमिनीत वाढणारे आणि याच्या बुंध्याला चार पाच फुटवे येतात म्हणून प्रांताबाहेर कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरात याही राज्यात त्याचा प्रसार झाला.  

साडेतीन हजार वर्षांहून अधिक जून्या फळाची आपण आज चव चाखतोय. तिखट, गोड अशा कुठल्याही पदार्थात डाळिंबाचे दाणे दिमाखात मिरवत असतात. आखातातून आलेलं हे तडकणारं फळ आता महराष्ट्रात स्थिरावलंय.  जगभरातील फळांच्या दरबारात गोड रसाळ मुकुट घालून बसलंय! 

हेही वाचा- 

जगभरातल्या जेवणात वापरला जाणारा हिंग भारतात कसा आला?

मंगळवेढा 'ज्वारीचं कोठार', इथल्या मालदांडी ज्वारीची ही रंजक गोष्ट तुम्हाला माहित आहे का?

 

टॅग्स :डाळिंबअन्नफळेइतिहास