मागील वर्षी पाण्याच्या टंचाईमुळे पीके गेली होती. त्यामुळे यंदा अनेक हेक्टर रिकाम्या झालेल्या क्षेत्रात पेरा झाल्याने उच्चांकी १७० टक्क्यांपर्यंत खरीपपेरणी पोहोचली आहे. प्रत्येक नक्षत्रात पडलेला पाऊस १९० टक्क्यांपर्यंत गेल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पीके जोमात आहेत.
जिल्ह्यांत झालेला पाऊस व पेरणी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. शेतकऱ्यांनी ठरवावे अन् निसर्गानेही ऐकावे असे चित्र यंदा जिल्ह्यात आहे. मागील वर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात पाण्याचे चित्र भीषण होते. सहा महिने कडक उन्हाळा जिल्ह्याने सोसला. शेती पिकांची होरपळ झाली.
काहीअंशी फळबागा व ऊस तग धरून होता. जनावरांची वैरण जोपासण्याइतकेही पाणी नसल्याने लवकर पाऊस सुरू व्हावा ही शेतकऱ्यांची धारणा होती तसे झालेही. अगदी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली दहा-बारा दिवसांनंतर पावसाने विश्रांती घेतली.
साधारण महिनाभर कमी अधिक पाऊस राहिला याच कालावधीत शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. यंदा कधी नव्हे इतक्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चार लाख ७० हजार हेक्टर म्हणजे १७० टक्क्यांपर्यंत खरीप पेरा झाला आहे.
जिल्ह्यात पाऊस झाला ३२७ मि.मी.- जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात सरासरी १९७.३ मि.मी. पडणे अपेक्षित आहे. जुलै महिना आणखीन आठ दिवस असताना या महिन्याची सरासरीही पावसाने ओलांडली आहे.- मंगळवारी सकाळपर्यंत ३२७.१ मि.मी. इतका म्हणजे १८९.३ टक्के इतका पाऊस पडला आहे. राज्यात ९२ टक्क्यांपर्यंत खरीप पेरा झाला असून सोलापूर जिल्ह्यात उद्दिष्टाच्या सर्वाधिक १७०.२० टक्के, अहमदनगर जिल्ह्यात ११५ टक्के तर धाराशिव जिल्ह्यात १०४ टक्के इतकी पेरणीची नोंद मंगळवारपर्यंत झाली आहे.- जिल्ह्यात सर्वाधिक (टक्केवारीत) २४ हजार ७७५ हेक्टर म्हणजे ४५५.३९ टक्के पेरणी उत्तर तालुक्यात झाली आहे. करमाळा तालुक्यात ८७ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावर ३७४ टक्क्यांपर्यंत पेरणी झाली आहे. इतर तालुक्यात पेरणी क्षेत्रात अधिक असली तरी टक्केवारीत कमी आहे.
जिल्ह्यात सुरुवातीपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे पेरणीही वेगाने करण्यात आली आहे. खरीप पेरणी आता जवळपास संपली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पडलेला १८९ पाऊस समाधानकारक आहे. पेरणीही पाच लाख हेक्टरपर्यंत गेली आहे. झालेली पेरणी व पिके समाधानकारक आहेत. यंदाची पेरणी जिल्ह्यात उच्चांकी आहे. - दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी