पुणे : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकरी अपघात योजना सुरू केली असून २०२३-२४ साठी २६ कोटी रूपयांची मंजूरी देण्यात आली आहे. हे अनुदान कृषी आयुक्तांकडे वर्ग करण्यात आले असून लाभार्थ्यांना त्याचा लाभ घेण्यास आता मदत होणार आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३-२४ अंतर्गत एकूण ३ हजार ९६२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी अनुदानासाठी प्रलंबित असलेल्या १ हजार २८६ प्रस्तावासाठी एकूण २५.७२ कोटी रूपयांचे उपलब्ध करून दिले आहे. या निर्णयामुळे तालुका स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव निकाली निघतील.
योजनेची वैशिष्ट्ये
योजनेमध्ये या अपघातांचा असेल सामावेश
१) रस्ता/रेल्वे अपघात, २) पाण्यात बूडून मृत्यू , ३) जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, ४) विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, ५) वीज पडून मृत्यू , ६) खून, ७) उंचावरुन पडून झालेला अपघात, ८) सर्पदंश व विंचुदंश, ९) नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, १०) जनावरांच्या खाल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी/ मृत्यू , ११) बाळंतपणातील मृत्यू , १२) दंगल, १३) नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला अपघात, १४) रस्त्यावरील अपघात/वाहन अपघात, १५) अन्य कोणत्याही कारणांमुळे झालेला अपघात, या अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना याचा लाभ मिळणार आहे.
या अपघातांचा सामावेश नसेल
१) नैसर्गिक मृत्यू, २) विमा कालावधीपुर्वीचे अपंगत्व, ३) आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे, ४) गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात, ५) अंमली पदार्थाच्या अमलाखाली असतांना झालेला अपघात, ६) भ्रमिष्टपणा, ७) शरीरातर्गत रक्तस्त्राव, ८) मोटार शर्यतीतील अपघात, ९) युध्द, १०) सैन्यातील नोकरी, ११) जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा समावेश असणार नाही.
कुणाला मिळणार लाभ?
राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण २ जणांना "गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
किती मिळणार आर्थिक मदत?
- अपघाती मृत्यू - २ लाख रूपये
- अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे - २ लाख रूपये
- अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे - २ लाख रूपये
- अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे - १ लाख रूपये
सदर योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसांच्या २४ तासांसाठी ही योजना लागू राहील. या कालावधीत वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य यापैकी कोणत्याही व्यक्तिला केंव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहतील.
सदर योजनेंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने / शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत.
आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ उतारा
- मृत्यूचा दाखला
- शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. ६- क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.
- शेतक-याच्या वयाच्या पडताळणी करीता शाळा सोडल्याचा दाखला / आधारकार्ड / निवडणूक ओळखपत्र. ज्या कागदपत्रा आधारे ओळख/वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे.
- प्रथम माहिती अहवाल / स्थळ पंचनामा / पोलीस पाटील माहिती अहवाल
- अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे