Join us

रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्याने कुंपणात वीजेचं करंट सोडलं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 11:22 AM

रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्याने वीजेचे कुंपण केले, प्रत्यक्षात घडलं असं घडेल याची त्यानेही कल्पना केली नसेल.

वीजप्रवाह सोडलेल्या तारकुंपणाला स्पर्श झाल्याने एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यातील बिटरगाव (खु.) शिवारात शनिवारी सायंकाळी सहा वाजता घडली. सुमेध धर्मपाल गवळे (३१) रा. भगतसिंग वॉर्ड, उमरखेड असे मृतकाचे नाव आहे.

सुमेध गवळे हे शनिवारी सायंकाळी दुचाकीवर आईला घेऊन बिटरगाव (खु.) येथील शेतशिवारात बी-बियाणे, खते घेऊन जात होता. दरम्यान पावसाला सुरुवात झाल्याने दुचाकी फसल्यामुळे ते जवळील धोंडबा बोंढारे यांच्या शेतात बियाणे, खते ठेवण्यासाठी गेले. मात्र बोंढारे यांनी त्यांच्या उसाच्या शेतीत रानडुकराचा त्रास असल्याने तार कुंपणात वीजप्रवाह सोडला होता.

त्याच ताराला स्पर्श झाल्याने गवळे यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी मृतकाच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यावर जमाव करून वीजप्रवाह सोडणाऱ्या धोंडबा बोंढारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल होईपर्यंत शवविच्छेदन करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी मृतकाचे वडील धर्मपाल गवळे यांच्या तक्रारीवरून धोंडबा बोंढारे यांच्यावर भादंवि ३०४ नुसार गुन्हा दाखल केला. शवविच्छेदनानंतर गवळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक नीलेश सरदार अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :फेंसिंगशेतीशेतकरीगुन्हेगारी