लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम चालू होऊन अडीच महिने झाले असले तरी ऊसतोड यंत्रणा सुरळीत नसल्यामुळे कार्यक्षेत्रातील बऱ्याच शेतकऱ्यांचा ऊस अद्यापही गाळपाविना फडावरच उभा आहे. ऊस नेण्यासाठी शेतकरी दररोज कारखान्यावर हेलपाटे मारत असून, चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्याकडे मिनतवारी करीत आहेत. शुक्रवारी तर शिंदाळा येथील शेतकरी अण्णाराव मुळे यांनी उसाच्या गव्हाणीतच ठाण मांडले.मारुती महाराज कारखान्याने ७६ दिवसांत १ लाख १६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. दररोज सतराशे ते अठराशे मेट्रिक टन उसाचे गाळप केले जात आहे. सरासरी उतारा ९.६१ आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अजूनही ३७०० हेक्टरवर ऊस उभा आहे. अपुऱ्या ऊसतोड यंत्रणेमुळे कारखान्याकडे पुरेसे ऊसतोड मजूर व वाहने नसल्यामुळे प्रशासन हतबल झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सध्या कारखान्याचा गळीत हंगाम कसाबसा सुरू असून अधूनमधून ऊस पुरवठा होत नसल्यामुळे गाळप यंत्रणा बंद पडत असल्याची परिस्थितीदेखील निर्माण होत आहे. तालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे जलस्रोतांत वाढ झाली नाही. विहिरी व बोअरचे पाणी देखील कमी झाल्यामुळे उसाला पाणी कसे द्यावे या चिंतेत शेतकरी आहे. ऊस गाळपासाठी शेतकरी कारखान्याकडे धाव घेताना दिसून येत आहेत. वानवडा येथील शेतकरी सभासद संतोष काळे यांच्या उसाची तोड नोव्हेंबरमध्येच होती. मात्र, जानेवारी संपत आला तरी ऊस नेला जात नाही. त्यामुळे उसाच्या वजनात घट होत असल्याचे काळे यांनी सांगितले, एकंदरीत ऊस नेता का ऊस असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सर्व सभासदांच्या उसाचे गाळप करणार...
ऊसतोड यंत्रणेसाठी यावर्षी मजूर व वाहन मालक यांच्याशी करार करूनदेखील निम्मे मजूर आलेच नाहीत. त्यामुळे ऊसतोडी वर विपरीत परिणाम न होत होत आहेत. ही परिस्थिती आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी कारखान्याच्या प्रशासनाकडून प्रवल चालू आहेत. सर्व सभासद शेतकऱ्याचा ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही - रवी बरमदे, कार्यकारी संचालक