हिंगोलीतील काही शेतकऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी आपले अवयव विक्रीस काढले होते. त्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. आता त्याच हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तालुका विक्रीचे फलक उभे केले आहेत. शिवाय याबाबतचे निवेदनही देखील तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह परिसरातील शेतक-यांकडून बँक कर्ज परतफेडीसाठी किडनी, लिव्हर, डोळे अवयव विक्रीचा मुद्दा लावून धरण्यात आला होता. आता चक्क अपर तालुका विक्रीचा पवित्रा घेतला. शेतजमिनी व गुराढोरांसह गोरेगाव तालुका विकत घेऊन सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी 8 जानेवारी रोजी अपर तहसीलमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गत नोव्हेंबर महिन्यात गोरेगावसह परिसरातील दहा कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून किडनी, डोळे, लिव्हर, अवयव विकत घेऊन बँक कर्जाची परतफेड करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली. यासाठी मुंबईला जाऊन शेतक-यांकडून उपोषण करण्यात केले. त्यानंतर नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर धड़कही दिली होती. परंतु शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रति सरकारला गांभीर्य नसल्याचा प्रत्यय येत शेतक-यांच्या पदरी निराशा पडली होती. आता परत जिल्ह्यातील शेतक-यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी ही गांधीगिरी केली आहे
कर्जाची परतफेड करा
सुमारे 90 टक्के शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा असून, काहींची घरे खासगी फायनान्स कंपन्यांकडे गहाण आहेत. तालुक्यातील संपूर्ण शेतजमिनी, गुराढोरांना विकत घेऊन कर्जाची परतफेड करा, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या, असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दशरथ मुळे, संतोष वैद्य, गजानन जाधव, राहुल कावरखे, रामेश्वर कावरखे, बळीराम सावंत, लक्ष्मण शिंदेसह परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.