राज्यात सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामात सुमारे पावणेपाच लाख हेक्टर क्षेत्र वाढेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यात ज्वारीखालील क्षेत्रात अडीच लाख हेक्टर अर्थात १४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. यासाठी ११ लाख १० हजार क्विंटल बियाणे, तर १६ लाख ७४ हजार टन खते उपलब्ध झाली आहेत.
राज्यात रब्बीखालीलपेरणी क्षेत्रात सर्वाधिक क्षेत्र हरभरा पिकाखाली (सुमारे २१ लाख ५२ हजार हेक्टर) असून, यंदा हरभऱ्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होणार नाही, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्याखालोखाल रब्बी ज्वारीचे क्षेत्र असून, राज्यात सरासरी १७ लाख ५३ हजार हेक्टरवर ज्वारी लागवड केली जाते. यंदा त्यात अडीच लाख हेक्टरने वाढ होऊन ते २० लाख हेक्टरपर्यंत जाईल. ही वाढ सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १४ टक्के आहे. गव्हाचे १० लाख ४९ हजार हेक्टर असलेले सरासरी लागवड क्षेत्र सुमारे साडेचार टक्क्यांनी कमी होऊन यंदा राज्यात १० लाख हेक्टरवर गहू पेरणी होण्याचा अंदाज आहे.
१६ लाख ७४ हजार टन खते उपलब्ध
राज्यात रब्बी हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र ५३ लाख ९८ हजार हेक्टर असून, यंदा ही लागवड ५६ लाख ७६ हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे. एकूण वाढ ही ४ लाख ७८ हजार हेक्टर अर्थात ८.८५ टक्के आहे. रब्बी ज्वारीसाठी ४२ हजार १७५ क्विंटल, गव्हाचे ४ लाख ४४ हजार ७३७ लाख विचटल, तर हरभऱ्याासाठी ५ लाख ३१ हजार ५६४ क्विटल बियाणे उपलब्ध आहे. एकूण बियाणांची. उपलब्धता ११ लाख १० हजार १५८ विचटल आहे, तर ३१ लाख टन खतांची मागणी असून, १६ लाख ७४ हजार टन खते उपलब्ध आहेत.
पुण्यात आज घेणार राज्यस्तरीय आढावा
कृषिमंत्री धनंजय मुंडे हे मंगळवारी (दि. १७) राज्याच्या रब्बी हंगामाचा आढावा घेणार आहेत. पुण्यातील साखर संकुल येथे होणाऱ्या या बैठकीला राज्याचे कृषी सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, तसेच सर्व संचालक व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.