कुंदन पाटील
जळगाव वाघूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यात जलसंपदा विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विनामूल्य ३८३० शेततळी उभारले जात आहेत.
या शेततळ्यांच्या माध्यमातून १९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. एकाच तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात विनामूल्य शेततळे उभारणीचा प्रयोग देशात पहिल्यांदाच राबविला जात आहे.
'वाघूर' प्रकल्पाअंतर्गत असलेल्या शाखांच्या माध्यमातून हा प्रयोग राबविला जात आहे. उपसा प्रणालीसह पाणीवापर संस्थेतील सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीत तळे उभारण्याचा संपूर्ण खर्च जलसंपदा विभाग करीत आहे.
विशेष म्हणजे, जलसंपदा विभाग या शेततळ्यांची ९ वर्षे विनामूल्य देखभाल करणार आहे. शेततळे उभारणीनंतर शेतकरी व पाणीवापर संस्थांसाठी वर्षातून ८ वेळा नाममात्र शुल्क आकारून शेततळ्यात पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. मे अखेर पर्यंत पहिल्या टप्प्यातील मंजूर २०२० शेततळे पूर्णत्वास नेले जाणार आहेत.
त्यानंतर प्रस्तावित १८१० शेततळ्यांचे काम हाती घेतले जाईल. आतापर्यंत १६० शेततळे पूर्ण झाले असून, त्यात जलसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक शेततळ्यात ३० लाख लिटर पाण्याचे सिंचन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा 'वाघूर'च्या कुशीत शेतशिवाराला 'जल' श्रीमंती लाभली आहे.
अशी आहे योजना
■ वाघूर योजना क्र.१
लाभक्षेत्र - १०१०० हेक्टर
शेततळे - २०२०
■ वाघूर योजना क्र.२
लाभक्षेत्र - २०३२ हेक्टर
शेततळे - १८१०
३० लाख लिटर पाण्यासाठी हंगामनिहाय दर (रुपयांत)
खरीप - ५२८
रब्बी - १ हजार ५६
उन्हाळी - १ हजार ५८४