Join us

जायकवाडीतून रब्बीसाठी सोडले पहिले आवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 1:06 PM

छत्रपती संभाजीनगरसह ३ जिल्ह्यांतील पिकांना फायदा

रब्बी हंगामासाठी मोसमातील पहिले आवर्तन जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी दुपारी ४ वाजता सोडण्यात आले. १०० क्युसेक्स क्षमतेने सुरू करण्यात आलेल्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे.

जायकवाडी धरणात सध्या ४५.५६ टक्के जलसाठा असून रब्बी हंगामासाठी शुक्रवारी पहिली पाळी सोडण्यात आली आहे. १०० क्युसेक्सने सुरू केलेल्या विसर्गात हळूहळू वाढ करून २ हजार क्युसेक्सपर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. सदर रब्बी पाळीचे पाणी २५ दिवस सुरू राहणार आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पुढील दोन पाळ्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

रब्बी पाळीचे पाणी परभणी जिल्ह्यातील कालवा साखळी क्र. किमी १२२ पर्यंत जाते. हंगामातील पहिले आवर्तन सोडताना विशेष काळजी घ्यावी लागते. सुरुवातीला कमी क्षमतेने पाणी सोडून कालव्याची चाचणी घेतली जाते. शेवटपर्यंत विनासायास पाणी पोहोचल्यानंतर विसर्गात हळूहळू वाढ करण्यात येते. दरम्यान, कालव्यास कुठे गळती लागलेली असल्यास दुरुस्ती करण्यात येते, असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.जायकवाडीच्या डाव्या कालव्यांतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील १ लाख २० हजार हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी जवळपास १७० दलघमी पाणी २५ दिवसांत धरणातून सोडण्यात येणार आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, बाजरी, तूर, हरभरा या पिकांसह फळबागांसाठी कालव्यातून सोडलेले पाणी लाभदायक ठरणार असल्याने जायकवाडी लाभक्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद जालना व परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डावा कालव्यावर १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर सिंचन

जायकवाडी धरणाच्या २०८ कि. मी. लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७६२० हेक्टर, जालना जिल्ह्यातील ३६ हजार ५८० हेक्टर आणि परभणी जिल्ह्यातील ९७ हजार ४४० हेक्टर क्षेत्र येते. या क्षेत्रातील पिकांना फायदा होणार आहे.

एकूण आठ आवर्तने

धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यातून रब्बी हंगामात ३, तर उन्हाळी हंगामात ५ आवर्तने दिली जातात. जलाशयातून एकूण १९४८ दलघमी पाण्याचा वापर केला जातो; परंतु यंदा पिकाची परिस्थिती व उपलब्ध जलसाठ्यानुसार जायकवाडी प्रशासनास पुढील पाणीपाळीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

पाणी सोडा

उजव्या कालव्यावर ४१ हजार ६८२ हे. क्षेत्र सिंचनाखाली येते. जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी. लांबीचा आहे. या कालव्याच्या लाभक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ हजार ४३२ हेक्टर, बीड जिल्ह्यातील ३७ हजार ९६० हेक्टर व अहमदनगर जिल्ह्यातील २ हजार २९० हेक्टर जमीन येते. पिकांसाठी पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :जायकवाडी धरणपाणीशेतीशेतकरी