हिंगोली येथील वळूमाता प्रक्षेत्रावर यंदा देशी-विदेशी प्रजातीच्या गवताची लागवड करण्यात आली असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत हे गवत कापणीसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या या ठिकाणी सुपर नेपियर, फोर- जी बुलेट, ऑस्ट्रोनियन रेड बांगलादेश हाफ रेड, बाहुबली आदी प्रकारच्या गवताची लागवड झाली आहे.
महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाच्या वळूमाता प्रक्षेत्रावर शंभरांवर लहान-मोठ्या म्हशी असून, या म्हशीसाठी बारा महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध या दृष्टीने प्रयत्न केले जातात. हिंगोली, भोगाव (बिजाराम) व इसापूर येथे जमीन आहे. या जमिनीवर चारा घेण्यात येतो. प्रामुख्याने हिंगोली येथील प्रक्षेत्रावर विविध प्रकारच्या गवतांची लागवड करण्यात येते.
पावसामुळे लांबली होती लागवड..
यंदा सुमारे वीस दिवस पावसाने हुलकावणी दिली. मृग आणि आर्द्रा कोरडा गेल्यामुळे गवताची लागवड खोळंबली होती. परंतु, मध्यंतरी झालेल्या जेमतेम पावसावर वळूमाता प्रक्षेत्रावर गवताची लागवड करण्यात आली. लागवडीनंतरही मध्यंतरी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे तलावाचे पाणी देण्याची वेळ आली होती. मात्र, १८ जुलैपासून जोरदार पाऊस कोसळल्याने गवत तरारले आहे. येत्या दोन महिन्यांत गवत उपलब्ध होणार आहे.
यंदा लागवडीसाठी देशीसह विदेशी गवताचे थोंब उपलब्ध झाली होती. मात्र, पाऊस लांबल्याने लागवड खोळंबली. त्यानंतर ५ व ६ जूनला झालेल्या पावसावर या गवताची लागवड करण्यात आली. पावसाने उघडीप दिल्यास गवताला तलावातून मोटारीद्वारे पाणी सोडण्यात येते. सध्या गवत एक ते दोन फुटांपर्यंत वाढले असून, येत्या दोन महिन्यांत कापणीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे म्हशीसाठी सकस आणि हिरवागार चारा मिळणार आहे तर काही गवताचे बेणे विक्रीसाठीही उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. श्याम खुणे, डॉ. बाळासाहेब डाखोरे यांनी दिली.