Join us

येणार्‍या तीन महिन्यांचा चारा पाणी प्रश्न होतोय गंभीर; पशुपालकात चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 5:12 PM

परराज्यांतून तसेच परजिल्ह्यातून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मेंढपाळ व गीर गाय पालक आलेले आहेत. सध्या परिसरात चारा न राहिल्याने या मेंढपाळ व गाय पालकांना चाऱ्याच्या शोधात दूरवर भटकंती करावी लागत आहे.

नसीम शेख

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णीसह परिसरात झालेल्या जोरदार गारपिटीनंतर आता जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. या गारपिटीमुळे खरीप हंगाम पूर्णतः उद्ध्वस्त झाला, तर झाडांना पानेही राहिली नाहीत. जंगलातील थोड्याफार चाऱ्याचीही पूर्णतः वाताहात झाली. त्यामुळे आता जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न तीव्र बनत आहे.

टेंभुर्णी परिसरात बाहेरील जिल्ह्यांसह अन्य राज्यांतूनही सध्या मेंढपाळ व गीर गाय पालक आलेले आहेत. सध्या परिसरात चारा न राहिल्याने या मेंढपाळ व गाय पालकांना चाऱ्याच्या शोधात दूरवर भटकंती करावी लागत आहे. याशिवाय सध्या परिसरातील सर्व छोटे-मोठे तलाव आटल्याने यांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे सध्या हे जनावरवाले खडकपूर्णा बॅकवॉटर परिसरातील कुंभारझरी येथे आपल्या जनावरांना घेऊन भटकंती करत आहेत.

तसेच, यावर्षी पूर्णा नदीला एकदाही पूर न आल्याने खडकपूर्णा धरणातही पाणी वाढलेले नाही. त्यामुळे हे बॅकवॉटरचे पाणीही आटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एप्रिल व मे महिन्यांत या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार असल्याचे दिसत आहे.शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी 

कृत्रिम पाणवठे तयार करा

१. या पाळीव जनावरांसह जंगलातील जंगली प्राण्यांचाही पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर बनणार आहे. परिसरात हरीण, ससे, कोल्हे, लांडगे, रोई, मोर आदी जंगली पशुपक्ष्यांची संख्या मोठी आहे.

२. यासाठी वन विभागाकडून लवकरच कृत्रिम पाणवते तयार केले जावेत, अशी मागणी पशुप्रेमींकडून केली जात आहे.

आणखी तीन महिने चारा-पाण्याचा प्रश्न

मागील २० ते २५ वर्षापासून आम्ही आमच्या २०० गीर गायींसह गुजरात राज्यातून टेंभुर्णी परिसरात कायम वास्तव्यास आलो आहे. उन्हाळ्यात आम्हाला खडकपूर्णा बॅकवॉटरच्या पाण्याचा फायदा होतो. मात्र, यंदा हे धरण न भरल्यामुळे बॅकवॉटरचे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरेल, याची शक्यता नाही.

शिवाय गारपिटीमुळे गायीच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. सध्या आमचे १० ते १२ परिवार कुंभारझरी परिसरात वास्तव्यास आहेत. आम्हाला आत्तापासूनच गायींच्या चारा- पाण्याची चिंता लागली आहे. आणखी तीन महिने या जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. - अर्जुन गवळी, गीर गाय पालक, गुजरात 

टॅग्स :गायदूधदुग्धव्यवसायपाणीकपातपाणी टंचाई