दोन दिवसांपासून हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गहू, ज्वारी, हरभरा काढणीसाठी धावपळ होताना दिसून येत आहे. खरीप हंगामाप्रमाणे यावेळेस हळद व इतर पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी काळजी घेताना दिसून येत आहेत.
गत खरीप हंगामात अतिवृष्टी झाली आणि कापूस, तूर व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात येऊन सरकारी कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. परंतु, अजूनही काही शेतकऱ्यांना शासनाची मदतही मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी उन्हाळी हंगामात पिकांची काळजी घेताना दिसून येत आहेत.
येत्या दोन-चार दिवसांत मराठवाड्यातील काही भागांत हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग सकाळपासूनच शेतात जाऊन हळद, ज्वारी, हरभरा आदी पिकांची काढणी करू लागला आहे. काढणी करतेवेळी अवकाळी पाऊस आला तर झाकण्यासाठी ताडपत्रीही सोबत शेतात घेऊन जात आहेत.
सद्यःस्थितीत हिंगोली जिल्हातील जवळाबाजार, आजरसोंडा, नालेगाव, तपोवन, करंजाळा, असोला, बोरी (सावंत), कळंबा, आडगाव (रंजे), ढवूळगाव, माटेगाव, परळी आदी भागांतील शेतकरी सध्या हळद काढणी, शिजवणे, वाळविणे तसेच गहू कापणी आदी कामांत व्यस्त असल्याचे दिसत आहे.
दूध विकून पैसे हाती येत नाही; मग हा उपाय करून बघा
अवकाळीने नुकसान झाल्यास भरपाई द्यावी
पंधरा दिवसांपूर्वीच काही भागांत अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाळी पिके व फळबागांचे नुकसान झाले. तेव्हा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. परंतु, अजूनतरी कोठेही पाहणी केलेली दिसत नाही. - सुरेश चव्हाण, शेतकरी, आडगाव (रंजे)
खरीप हंगामापासून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे सण, उत्सव कसे साजरे करावेत, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यात आता अवकाळी पावसामुळेही नुकसान होत आहे. अशावेळी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. - एकनाथ नागरे, शेतकरी, असोला
अवकाळी पावसाची भीती वाटत आहे म्हणून शेतकरीवर्ग ज्वारी, हळद, हरभरा आदी पिकांची काढणी लवकर करू लागला आहे. दुपारी ऊन पडत आहे म्हणून मुक्काम शेतात करून सकाळी पिकांची काढणी करत शेतीमाल घरी आणून टाकत आहेत. - माणिकराव दशरथे, शेतकरी, परळी