झाडाला वाळवी लागली की, झाड वाळते असा समज अनेक शेतकऱ्यांमध्ये आहे पण वाळवी लागल्यावर झाड वाळत नाही तर उलट त्याचा फायदा होतो असा दावा नैसर्गिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी समीर वाघोले यांनी केला आहे. झाडाला लागलेली वाळवी ही आपल्या शेतीसाठी चांगलीच असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, वाळवी ही कधीच जिवंत झाडाला लागत नाही. वाळवी ही मेलेल्या झाडांचं उत्कृष्ट खतामध्ये निर्माण करण्यासाठी निसर्गाने केलेली व्यवस्था आहे. वाळवी ही झाडावरील वाळलेली साल खाते आणि त्यापासून खत बनवते. त्यामुळे वरून जरी वाळलेले दिसत असले तरी आतमध्ये ते झाड जिवंत राहते.
झाडांचे मृत झालेली त्वचा किंवा साल खाऊन त्यापासून उत्कृष्ट प्रकारचे खत तयार करून देण्याचे काम वाळवी करते. एक प्रकारे निसर्ग स्वच्छ करण्याचे कामच ही वाळवी शेतीमध्ये करत असते. त्यामुळे वाळवी ही नैसर्गिक शेतीचा अविभाज्य घटक आहे.
वाळवी आपल्या शेतात यावी यासाठी अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये लाकडाचे ओंडके ढिग करून ठेवत असतात. त्यामुळे वाळवी आपले काम अविरतपणे सुरू ठेवते. वाळविणे तयार केलेली माती ही शेतीमध्ये आपण खत म्हणून उपयोग करू शकतो त्या खतांमध्ये अनेक अन्नद्रव्ये असल्याचं नैसर्गिक शेती करणारे शेतकरी समीर वाघोले सांगतात.