Join us

पशुधन घटल्यामुळे शेणखताला आले 'सोन्याचे' दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 11:16 AM

मातीचा कस आला शून्यावर

आधीच दुष्काळी परिस्थिती, त्यात पशुधन घटल्याने आता शेणखतालाही सोन्याचे दिवस आले आहेत. शेतीसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या शेणखताचे दर वाढल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे आहे. पाणीटंचाईमुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकट होत असताना, शेतीसाठी लागणारे शेणखत महागल्याने शेतकऱ्यांना शेणखत विकत घेणे अवघड झाले आहे. यामुळे शेतकरी बांधवांना जमिनीचा पोत टिकवून ठेवण्याचे आवाहन उभे राहिले आहे.

भारत कृषिप्रधान देश असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय केला जातो. शेतकऱ्यांकडील पशुधन पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याने शेतीमध्ये शेणखताचा वापर कमी झाला आहे. परिणामी, रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. सद्यःस्थितीत अडीच ते तीन हजार रुपये ब्रास ट्रॉलीने शेण खत मिळत आहे.

शेणखत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असून, या खताचा वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारतो. मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. रासायनिक खतांचा वाढलेला वापर व उत्पादन वाढण्याची स्पर्धा यामुळे रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापराने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून, आरोग्यपत्रिका तयार करणे आवश्यक आहे.

अवेळी पडणारा पाऊस, रासायनिक खतांचे वाढलेले भाव, वाढती रोजंदारी, मजुरांची टंचाई या कारणाने शेती करणे परवडत नाही. दरवर्षी रासायनिक खतांचा वापर करतो; परंतु यावर्षी शेतात शेणखत व लेंडी खत टाकण्यासाठी विकत घेतले आहे. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारणार असून उत्पादनातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. - नवनाथ खाटवकर, शेतकरी

हेही वाचा - शेतकरी बांधवांनो भूक मंदावली, थकवा जाणवतोय; किडनीचा आजार तर जडला नाही ना?

रासायनिक खतांचे दुष्परिणाम

■ शेतीमध्ये रासायनिक खतांचा अधिक वापर केल्याने जमिनीचा पोत खराब होतो.

■ पर्यायाने शेतजमीन भविष्यात नापीक होण्याचा धोका संभवतो. पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत जातो.

■ रासायनिक खतांमुळे पाण्याचे स्रोतही दूषित होऊन जमिनीतील कस टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त जिवाणूंना मारक ठरतात.

कंपोस्ट खतनिर्मितीची गरज

■ शेणखत विकत घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे.

■ सध्या २५०० ते ३००० रुपये ब्रास ट्रॉली याप्रमाणे खत विकत घ्यावे लागत आहे.

■ एकरी जवळपास ३५ हजार रुपये खर्च करावा लागतो.

■ त्याचा काटकसरीने वापर केला तरी निदान २५००० तरी खर्च करणे गरजेचे आहे.

■ शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून शेणखताबतच कंपोस्ट खतनिर्मिती करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :सेंद्रिय खतशेतीशेतकरीखतेबाजार