विजय विजापुरेबऱ्हाणपूर : अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागातील खरीप पिके चांगल्या प्रमाणात आली आहेत; परंतु सद्य:स्थितीत वेळोवेळी पडणारा पाऊस व मजुरांची चणचण यामुळे मूग व उडीद या महत्त्वाच्या पिकांची रास करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे आहे.
त्यात आता हार्वेस्टर मशीनचे आगमन झाल्याने रास करणे सोपे बनले आहे. या मशीनमुळे शेतकऱ्यांच्या वेळेत व खर्चात मोठी बचत होत आहे. अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात मूग व उडीद उत्पादकांनी या मशीनच्या माध्यमातून रास करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.
वास्तविक पारंपरिक पद्धतीने रास करण्यासाठी मजुरांच्या मदतीने अगोदर कापणी करावी लागते. यानंतर कापलेले पीक गोळा करून मळणी मशीनच्या साह्याने रास करावी लागते. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागते.
यामध्ये कामास लावलेल्या प्रत्येक मजुराला दिवसाकाठी ४०० ते ५०० रुपये मजुरी द्यावी लागते. एका एकरसाठी जवळपास दहा मजुरांना दिवसभर घेऊन रास ३०० रुपये पाकीट मशीनला पैसे देऊन करावी लागते. यामध्ये जवळपास एकरी निम्म्या किमतीमध्ये पंजाबी मशीनवर ही रास पूर्ण केली जाऊ शकते.
पंजाबी मशीनच्या माध्यमातून केल्यानंतर काही तासांतच रास होते. एकरी २००० ते २५०० रुपये मशीनचे भाडे आहे. यामुळे वेळ व आर्थिक बचत डोळ्यासमोर ठेवून मूग व उडीद उत्पादक शेतकरी पंजाबी मशीनच्या साह्याने रास करत असल्याचे चित्र तालुक्याच्या उत्तर भागात दिसत आहे.
मूग, उडदाचे दर वाढण्याची शक्यतायावर्षीच्या खरीप हंगामातील मूग, उडीद मार्केटला येण्यास सुरुवात झालेली आहे. मुगाला ७००० ते ७९००, तर उडदाला ८३०० ते ९२३५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. यापुढे मोठ्या प्रमाणात उडीद, मूग मार्केटमध्ये आल्यावर दर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती दुधनी येथील आडत व्यापारी महिबूब डिग्गी यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने मूग व उडीद पिकाची रास करण्यासाठी पंजाबी हार्वेस्टर मशीन उपयुक्त ठरत आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी पंजाबमधील शेतकऱ्यांशी संपर्क ठेवून यावर्षी मशीन मागवली आहे. दरवर्षी रास करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. - इरप्पा होटकर, समन्वयक
रास करण्यासाठी दरवर्षी मजुरीने माणसे लावत होतो. यामध्ये पीक कापून जमिनीवर टाकल्यानंतर अवकाळीने नुकसान झाले होते. मजुरीचा खर्च व जोखीम अशा दोन्ही बाबी घातक ठरत होत्या. मात्र, पंजाबी मशीनमुळे काही तासांतच रास हातात पडली. यावर्षी पंजाबी मशीनने रास करून घेतल्याने वेळ व पैशाची बचत झाली आहे. - गोपीचंद बनसोडे, शेतकरी, बऱ्हाणपूर