सध्या लग्नाचा मोसम जोरात सुरू असून २० एप्रिलपासून अधिक लग्नतिथी असल्यामुळे लग्नाची धूम आहे. अशात तापमानाचा पारा ३८ ते ४० अंशावर गेल्याने वन्हाडींच्या अंगाची लाहीलाही होत आहे.
तालुक्यात गेले काही दिवस ढगाळ वातावरण होते. त्यानंतर अचानक उन्हाचा तडाखा वाढल्याने लग्नाला जाताना वन्हाडी मंडळींच्या अंगाची लाहीलाही होत असून महिला व लहान मुलांचे यात सर्वात जास्त हाल होताना दिसत आहे. जवळचे लग्न आल्यास लग्नाला जाण्याशिवाय गत्यंतर नसते.
भरउन्हात लग्न असल्याने वन्हाडी जेवणापेक्षा पाणी पिण्यावर भर देत आहेत. लग्नात तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे तसेच उन्हाचा तडाखा वाढल्याने महिला व लहान मुले हैराण होत आहेत.
लग्नतिथी अधिक असल्याने काही शेतीची कामे आवरून तर काही परत घरी जाऊन रखडलेली कामे करत आहेत. लग्नसराईची धूम अजून पंधरवडा चालू राहणार असल्याने शेतीची कामे टप्प्या-टप्प्यात करत आहेत. लग्नासाठी अनेक जणा दुचाकीवर भरउन्हात एकीकडून दुसरीकडे जात असल्याने रस्त्यावरील चारचाकी, दुचाकीची संख्याही वाढल्याचे दिसत आहे.
रात्रीच्या लग्नाला अनेकांची पसंती
उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता अनेक जण खुला मंडप विवाह समारंभाला पसंती देत आहेत. त्यामुळे लग्न मुद्दामहून उशिरा लावले जात आहे. कडक उन्हाळ्यातील हे लग्न रात्री ९ वाजेच्या पुढेच लागताना दिसत आहे. अचानक बदललेल्या वातावरणामुळे अवकाळीच्या धास्तीने ग्रामीण भागातही याबाबत बदल झाल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांसह जनावरांना बसतोय उन्हाचा फटका
तापमानामुळे विवाह समारंभात ताक, मठ्ठा भोजनातील अविभाज्य घटक झाला आहे. दही, तूप, ताक, लोणी आदींची विक्री वाढली असली तरी तालुक्यातील दूध संकलनात घट झाली आहे. उन्हामुळे दुभत्या जनावरांचे दूध देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दुभत्या जनावरांची काळजी घेण्यासाठी ओले बारदान, स्प्रिंकलरद्वारे पाणी मारून गोठा थंड ठेवला जात आहे.
भरपूर पाणी पिण्याचे आवाहन
एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये उष्णता वाढत असल्याने नागरिकांना उलटी, चक्कर, निर्जलीकरण, बेशुद्ध पडणे, उष्माघात असा त्रास होतो. मागील काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांना काम असेल तर घराबाहेर पडा आणि भरपूर पाणी प्या, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?