Join us

गेल्या वर्षी खरीपाचा पीक विमा काढणाऱ्या ५० टक्के शेतकऱ्यांना कंपनीने डावलले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 10:09 AM

२२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आठ कोटी रुपये

यादवकुमार शिंदे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील ४५ हजार शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी खरिपाचा पीक विमा काढला असताना प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तालुक्यातील २२ हजार ५७४ शेतकऱ्यांच्याच बँक खात्यावर ७ कोटी ९० लाख ६४ हजार रुपयांची रक्कम शुक्रवारपासून जमा करण्यास सुरुवात झाली असून विविध निकष लावून विमा कंपनीने तालुक्यातील २२ हजार ४२६ शेतकऱ्यांना विमा कंपनीने वाऱ्यावर सोडले आहे.

गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयगाव तालुक्यातील ४५ हजार शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांचा एक रुपया भरून विमा काढला होता. शेतकऱ्यांच्या हिश्श्याची उर्वरित रक्कम शासनाने भरली होती. तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेत शिवारातील पिके वाळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नाही. नव्या निकषानुसार नुकसानीची ७२ तासांच्या  आत तक्रार पोर्टलवर करणाऱ्या शेतकऱ्यांनाच पीक विमा मंजूर होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी नियुक्त पीक विमा कंपनीने दाखल झालेल्या प्रस्तावांची छाननी केली. त्यात २२ हजार ५७४ शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याच्या ७२ तासांच्या आत तक्रार विमा कंपनीकडे केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना ७ कोटी ९० लाख ६४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला असून, या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीकडून शुक्रवारी सायंकाळपर्यंत रक्कम जमा करण्यात आली.

तालुक्यातील सामूहिक क्षेत्रात असलेल्या ८ हजार ५३७ शेतकऱ्यांनी संमती पत्र न दिल्याने त्यांना पीक विम्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे, तर २ हजार ७२८ शेतकऱ्यांनी संबंधित पोर्टलवर नुकसानीच्या तक्रारी करूनही ई पीक पाहणी न केल्याने त्यांना पीकविम्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

विशेष म्हणजे तालुक्यातील ६३ टक्के शेतकऱ्यांनीच ई-पीक पाहणी केली आहे. त्यामुळे विमा कंपनीने तालुक्यातील तब्बल ११ हजार २६५ शेतकऱ्यांना अपात्र ठरविले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

कपाशी व मका पिकाचाच विमा मंजूर

• सोयगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात कपाशी आणि मका या खरिपाच्या पिकांनाच विमा मंजूर झाला असून, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पीकविम्याची रक्कम अदा करण्यात आलेली नाही.

• तालुक्यात गेल्या वर्षी ७ हजार ३७४ हेक्टरवर सोयबीनची लागवड करण्यात आली होती, अशी माहिती तालुका कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे.

दखल न घेतल्याने ऑफलाइन तक्रार केलेल्या ११ हजार १६१ शेतकऱ्यांचे अर्ज पडले अडगळीत

• शेतकऱ्यांना विमा देताना विविध कारणे देत पीक विमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. तालुक्यातील ११ हजार १६१ शेतकऱ्यांनी ऑफलाईन तक्रारी केल्या होत्या.

• या तक्रारींची दखलच विमा कंपनीने घेतलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना सध्यातरी विमा मंजूर केलेला नाही.

हेही वाचा - स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट

टॅग्स :पीक विमाशेतीशेतकरीपीकमराठवाडाशेती क्षेत्र