बीड येथीलबाजारात उन्हाळ्यामध्ये कोकणचा हापूस आंबा ४०० रुपये, तर कर्नाटकचा हापूस ३०० रुपये किलोपर्यंत विकला गेला. भरपूर आंबे खाल्ल्यानंतर उतारा म्हणून मागणी असणाऱ्या जांभळालाही हापूसचा भाव आला आहे. मधुमेहावर नियंत्रण होत असल्याने गुणकारी जांभळाची खरेदी ग्राहक करीत असतात. इतर मोसमी फळांच्या तुलनेत जांभळाचे आकर्षण वाढते; परंतु यंदा वाढती उष्णता आणि आवक कमी होत असल्याने बाजारात जांभळाला हापूसचा भाव आला आहे.
मे महिना संपत नाही तोच बीडच्या फळ बाजारात जांभळाची आवक सुरू झाली. ग्रामीण भागातून विक्रीसाठी आणलेल्या जांभळाच्या टोपल्यावर ग्राहकही तुटून पडतात. सुरुवातीला ४०० रुपये किलोपर्यंत जांभळाची विक्री झाली. आता आवक वाढल्याने दरात किलोमागे १०० ते १५० रुपयांची घसरण झाली आहे.
का वाढले दर?
मधुमेहावर गुणकारी, पाचन सुधारणाऱ्या जांभळाला मागणी असते. पावसाळा सुरू होताच जांभळाची आवक सुरू होते; परंतु आवक कमी असल्याने जांभळाचे दर वाढते असतात.
बीड, पाटोद्यासह इतर जिल्ह्यांतून आवक
बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा, मंडारी, पाली, कर्जनी, कोळवाडी, कपिलधारवाडी, पाटोदा तालुक्यातील डोंगराळ भागात जांभळाची झाडे आहे. मागील काही वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरीदेखील त्यांच्या फळबागेत जांभळाचे उत्पादन घेतात. याशिवाय बीडच्या बाजारात श्रीरामपूर, भूम, वाशी (जि. धाराशिव) भागातून जांभळाची आवक होते.
गतवर्षी इतकाच भाव
बाजारात जांभळाची आवक कमीच असते, तसेच आवक होण्याचा कालावधीदेखील कमी असतो. त्यामुळे जांभळाचा गतर्षीइतकाच भाव आहे. बाजारात होणाऱ्या आवक आणि मागणीनुसार दर कमी-जास्त होतात.
मधुमेह असणारे बारमाही जांभळाचा घटक असलेली औषधी घेत असले तरी पावसाळ्यात थेट डोंगरझाडीतील नैसर्गिक जांभळांना विशेष मागणी असते. आंब्यावर जांभूळ उतारा मानला जातो. संकरित व गावरान दोन्ही जांभळांची आवक बीडमध्ये होते. मोसमी व गुणकारी असल्याने खरेदी करताना ग्राहक दराचा विचार करत नाहीत.- एकबाल बागवान, फळांचे व्यापारी, बीड