काही वर्षांपूर्वी साधारणपणे जून महिन्याच्या सुरुवातीला भारतात मान्सून केरळात दाखल होत होता. कर्नाटक,महाराष्ट्रात किंवा दक्षिण राज्यातून तो आठवडाभरात मुंबईत प्रवेश करायचा आणि पुढच्या काही दिवसात तो हळूहळू महाराष्ट्र व्यापून टाकायचा. त्या अगोदर मे महिन्याच्या मध्यावधीत एखादा दुसरा वळवाचा पाऊस हमखास पडायचा ज्याचा फायदा शेतकरी बांधवांना शेतीच्या मशागतीसाठी व्हायचा.
त्यानंतर जून महिन्यात पडलेल्या पुरेशा पावसानंतर महाराष्ट्रात सर्व भागात खरीप पिकांच्या बहुतांश पेरण्या पूर्ण होत असत. जुलै -ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या श्रावण महिन्यात दिवसभरात कधी ऊन तर कधी भुरभुर स्वरूपात माफक पाऊस पडायचा जो केवळ पावसाच्या पाण्यावर घेतलेल्या खरीत पिकांच्या मुख्य वाढीसाठी फायदेशीर ठरायचा. वेळोवेळी पडणारा पाऊस खरीप पिकांना त्यांच्या संपूर्ण कालावधीत उपयोगी पडून अपेक्षित उत्पादन मिळण्यास मदत व्हायची . एक मात्र खरं आहे की हे सगळं असलं तरी काही ना काही प्रमाणात त्या काळातही पावसाचा लहरीपणा (कधी जास्त,कधी कमी,लहान मोठे पावसात खंड) होताच, अलीकडच्या काळात तो वाढला एवढं मात्र नक्की.
अलीकडच्या काही वर्षात मात्र निसर्गचक्रात विशेषतः पावसाच्या पडण्याच्या प्रमाणात, त्याच्या आगमनात, सातत्यात खूप फरक पडत चाललाय. कदाचित हा ग्लोबल वॉर्मिंगचाही परिणाम असावा. आता महाराष्ट्रात ७ जूनला क्वचितच पावसाचे आगमन होते. झाले तरी सुरुवातीला चांगल्या प्रमाणात पडलेला पाऊस अचानक थांबतो व जवळपास 3 आठवडे/ महिनाभराचा खंड पडतो, त्यामुळे दुबार /तिबार पेरणीचे संकट ओढवते. कधी २-३ दिवसातच धो धो पाऊस पडून जातो तर कधी तो नेमका खरिपाची पिके सोंगायला आलेली असतानाच मोठ्या प्रमाणात पडतो.
एकूणच पावसाची सरासरी गाठली जात असली तरी पीक उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. पावसाच्या आगमनात, त्याच्या पडण्यात, सातत्य नसल्याने खरीप पिके नेमके कधी पेरावेत यासाठी शेतकरी बांधवांच्या मनात संभ्रमावस्था असते. त्यासाठी विद्यापीठामार्फत आपत्कालीन पीक नियोजन विकसित करण्यात आलेले असून त्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी पीक लागवड केली पाहिजे.
ऑगस्ट महिना उजाडला असल्याने विद्यापीठ विकसित contingent crop planning प्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस लांबला तर शेतकरी बांधवांना सूर्यफूल,तूर,एरंडी, हुलगा किंवा बाजरी तसेच सूर्यफूल + तूर (२:१) आंतरपीक किंवा एरंडी + दोडका मिश्र पीक घेता येईल.
-डॉ. कल्याण देवळाणकर, कृषी शास्त्रज्ञ