आयुब मुल्लाखोची: मे महिन्यात वळीव पाऊस समाधानकारक पडत असल्याने खरीप हंगाम वेळेत सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. गत वर्षी वळवाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे खरीप हंगामाचे वेळापत्रक बदलले होते.
विजांचा कडकडाट, वादळ वाऱ्याचा तुफान मारा यामुळे काही ठिकाणी ऊस, फळपिके आडवी झाली आहेत. पाण्याअभावी तहानलेल्या पिकांना मात्र जीवदान मिळाले आहे. गतवर्षी वळीव अन् मान्सून दोहोंची अनियमितता अनुभवयास आली.
पाऊस तर असमाधानकारक झाला. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दुष्काळ परिस्थिती जाहीर केली. हातकणंगले व गडहिंग्लज हे तालुके दुष्काळी जाहीर केले. शिरोळ तालुक्यातील बहुतांश महसल मंडळे दुष्काळग्रस्त ठरली. जिल्ह्यात पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला. विहिरी, कूपनलिकांची पाण्याची पातळी घटली.
जिल्ह्यात तापमान उच्चांकी राहिले. गत पंधरा दिवसांत उन्हाच्या झळांनी नागरिक असहा झाले आहेत. अशा स्थितीत वळीव पडत आहे. जिल्ह्यात सर्वच भागात एकाचवेळी वळीव लागला नाही. मेच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात हातकणंगले तालुक्यात वळीव लागला. काही ठिकाणी झाला, तर सोमवारी व मंगळवारी पुन्हा वादळी वाऱ्यासह वळीव झाला.
वादळी वाऱ्याने केळी, आंबा, ऊस पिके मुळापासून काही प्रमाणात निघाली. ऊस, भाजीपाला पिके आडवी झाली. उन्हामुळे सोकलेली पिके पुन्हा उभारी घेतील. जमिनीत ओलावा तयार झाल्याने नांगरट, रोटर मरण्याची लगबग सुरू होऊन मशागतीची धांदल पाहावयास मिळणार आहे.
वादळी वाऱ्याने नुकसान • वादळी वाऱ्याने शहरात झाडे, विजेचे खांब तुटून पडण्याचे प्रमाण अधिकचे झाले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण अल्प राहिले आहे.• हंगाम नसताना अचानक पाऊस हा वळीव पाऊस म्हणून ओळखला जातो. यामध्ये गारपीटही होते. वीज पडण्याचा धोका जास्त असतो. कमी कालावधीत जास्त पावसाची नोंद होते.
खरिपाच्या पेरण्या सात जूनला सुरू होतात. गतवर्षी वीस ते पंचवीस दिवसांनी हंगाम पुढे गेला होता. यावर्षी वेळेत हंगाम सुरु होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. - राजाराम पाटील, बळीराजा अॅग्रो एजन्सी, पेठवडगाव