यंदा कोकणात आंबा फळ गळीचे संकट असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. मार्च उजाडला तरी बाजार समितीत हापूस आंब्याची आवक अपेक्षित तेवढी नाही.
या हंगामात कोकणातील आंबा केवळ ४० टक्केच येईल, असा अंदाज व्यापाऱ्यांचा असल्याने 'कर्नाटक हापूस'चीच चव चाखावी लागणार आहे.
अबालवृद्ध ज्याची वर्षभर आतुरतेने वाटत पाहत असतात, तो फळांचा राजा फेब्रुवारीतच बाजारात दाखल झाला आहे. रत्नागिरी, देवगड, कुणकेश्वर, मालवण येथून मोठ्या प्रमाणात हापूस कोल्हापुरात येतो.
फेब्रुवारीपासून आवक सुरू होते, मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर बाजार समितीत कोकणातून किमान एक हजार बॉक्सची आवक व्हायची. यावर्षी मात्र, निसर्गाने कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाने झाडांना झोडपून काढले. त्यातून तग धरलेली फळे सध्या बाजारात दिसत आहेत मात्र, गेल्या महिनाभरापासून उष्णता कमालीची वाढली आहे. त्याचा परिणामही सध्या आंबा बागांवर झाला आहे. सध्या कोल्हापूर बाजार समितीत रोज शंभर ते दीडशे बॉक्सची आवक होत आहे.
कार्बाइडमुळे काय होते...
कॅल्शियम कार्बाइडचा वापर आंबा, केळी, फणस, लिची आणि इतर फळे पिकवण्यासाठी केला जातो. कॅल्शियम कार्बाइड पावडरचे पॅकेट फळांच्या डब्यात ठेवले जाते. यामुळे अॅसिटिलीन वायू तयार होतो. त्यातून फळे पिकतात.
कार्बाइडने पिकवलेला आंबा असा.....
रंग : आंब्याचा रंग एकसमान नसतो. देठः आंब्यांचा देठ जाड आणि नौट पिकलेला नसतो.
चव : कार्बाइडने पिकवलेले आंबे कमी गोड असतात, काहीवेळा गर जाड राहतो. वासः हा सुगंध देत नाहीत.
आंबा कसा ओळखाल...
आंबे पाण्याच्या बादलीत टाका आणि निरीक्षण करा. जर आंबे पाण्यावर तरंगत असतील तर ते रासायनिक पद्धतीने पिकलेले असतात.
यंदा कोकण हापूसचे उत्पादन कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या आवक कमी आहे. - सलीम बागवान. आंबा व्यापारी.