Join us

तालुका खरेदी विक्री संघाच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्यांना घातला १९ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 12:32 PM

तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक एम.डी. नीलवर्ण यांनी हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांचा हरभरा ऑफलाइन खरेदी करून ऑफलाइन पावत्या दिल्या होत्या. यामध्ये चौकशी पथकाने केलेल्या निरीक्षणामध्ये काही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे सादर केलेल्या पावतीवरून दिसून आले.

परभणी तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक एम.डी. नीलवर्ण यांनी हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांचा हरभरा ऑफलाइन खरेदी करून ऑफलाइन पावत्या दिल्या होत्या. यामध्ये चौकशी पथकाने केलेल्या निरीक्षणामध्ये काही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे सादर केलेल्या पावतीवरून दिसून आले.

यामध्ये मूळ तक्रारकर्ते यांची व ऑनलाइन लॉट रद्द केलेल्या आठ शेतकऱ्यांची एकूण १९ लाख ३५ हजार ९४७ एवढ्या रकमेची प्राथमिक स्वरूपात अफरातफर झाल्याचे निदर्शनास आले. त्यावरून चौकशी अहवालानुसार व तपासणीमधील अभिलेखाच्या आधारे संबंधित व्यवस्थापकाविरुद्ध गैरव्यवहार केल्याने कोतवाली ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, सहकार अधिकारी अश्विनी निकम यांनी कोतवाली ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ मार्च ते १३ जून २०२३ या कालावधीत घडला आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या ३१ ऑक्टोबर २०२३ च्या पत्रासोबत कार्यालयास तक्रार प्राप्त झाली होती. यानंतर सदरील प्रकरणात चौकशी समिती गठित केली होती.

चौकशी समितीत बाब आली समोर

• चौकशी समितीच्या अहवालानुसार नऊ निष्कर्ष सादर करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर हरभरा विक्री तसेच सोयाबीन खरेदी केल्यानंतर त्याची ऑफलाइन पावती काही जणांना देण्यात आली. यामध्ये आठ शेतकऱ्यांनी चौकशी पथकास संपर्क साधला. त्यांची अकरा लाख ८१ हजार दोन रुपयांची रक्कम फसवणूक झाल्याचे समोर आले. याशिवाय मूळ तक्रारकर्ते सर्जेराव आहेर यांची व ऑनलाईन लॉटरी केलेल्या आठ शेतकऱ्यांची एकूण १९ लाख ३५ हजार ९४७ एवढ्या रकमेची प्राथमिक स्वरूपात अफरातफर झाल्याचे निदर्शनास आले.

• यामध्ये संघाचे व्यवस्थापक माणिक निलवर्ण जबाबदार असल्याचे दिसून आले. चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार व तपासणीतील अभिलेखाच्या आधारे एम.डी. नीलवर्ण यांनी संस्थेमध्ये केलेल्या गैरव्यवहार निदर्शनास आल्याने त्यांच्याविरुद्ध कलम बीएनएसएस १७३ अंतर्गत भारतीय दंड संहिता १८६० ४२० कलम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

टॅग्स :शेती क्षेत्रपरभणीशेतकरीबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमराठवाडा