एक शेतकरी एक डीपी योजनेअंतर्गत शेतात रोहित्र जोडणीचे काम सुरू असताना लाभार्थ्याच्या नावावर अज्ञाताने कृषी पंप उचलल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मूळ लाभार्थ्याला रोहित्र मिळत नसून सौरपंप योजनेचा देखील लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीड जिल्ह्यातील ग्राहकांना वेळेत व हमखास वीजपुरवठा व्हावा, यासाठी अनुदानासह स्वतंत्र रोहित्र वितरित केले जात आहेत; परंतु सौरपंप योजनेच्या लाभार्थ्यांना यातून वगळण्यात आलेले आहे. कोणत्याही एकाच योजनेचा ग्राहकाला लाभ घेता येतो. आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील शेतकरी अशोक सयाजीराव गोल्हार यांच्या शेतात (सर्व्हे नंबर ५५) एक शेतकरी एक डीपी योजनेअंतर्गत काम सुरू होते.
यासाठी शेतकरी गोल्हार यांनी जानेवारी २०२१ ला १० हजार २७३ हजार रुपयांचा लाभार्थी हिस्सा भरला. त्यानंतर मार्च २०२३ ला कंत्राटदार गर्जे यांच्यामार्फत विद्युत खांब उभे करून रोहित्र बसविण्याचा साचा तयार करण्यात आला आहे; परंतु लाभार्थ्यांच्या नावावर अज्ञाताने सौरपंप उचलल्याने त्यांच्या ग्राहक क्रमांकावर सोलार योजनेचा टॅग दिसत आहे.
यामुळे शेतकरी दोन्ही योजनांपासून मागील चार वर्षांपासून वंचित राहिले आहे. याच प्रकारे दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत देखील प्रकार घडल्याचे शेतकरी गोल्हार यांनी सांगितले आहे.