नवी दिल्ली: देशभरातील नव्या गाळप हंगामाची सुरुवात जरी थोडी लवकर झालेली असली तरी प्रत्यक्ष ऊस गाळप आणि साखर उत्पादनाची गती गतवर्षीच्या तुलनेत सुरुवातीला संथ होती. ३० नोव्हेंबर अखेर देशभरात ४३३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झालेला असून गत वर्षी या तारखेपंर्यत ४५१ कारखाने सुरु झाले होते. ३० नोव्हेंबर पर्यंत ऊस गाळप ५११.०२ लाख टन झाले असून ते गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ५९.५५ लाख टनानी कमी आहे. साहजिकच ४३.२० लाख टनाचे नवे साखर उत्पादन गत वर्षीच्या या तारखेपर्यन्त झालेल्या ४८.३५ लाख टनापेक्षा ५.१५ लाख टनाने कमी आहे. सरासरी साखर उतारा देखिल ०.२ % ने कमी आहे.
“यंदा उत्तरप्रदेशातील साखर कारखाने पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यात सुरु झाले. मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर हंगाम १ नोव्हेंबर नंतर सुरु झाला. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील उस दर आंदोलनाच्या परिणाम स्वरूप कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु होण्यात विलंब झाला आहे” असे राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी म्हटले आहे.
एल निनोच्या प्रभावाच्या परिणाम स्वरूप जो वातावरण बदल झाला आहे, त्यामुळे यंदाच्या वर्षीचे ऊस गाळप व साखर उत्पादन गत वर्षीच्या तुलनेत कमी राहणार असल्याचे श्री. दांडेगावकर यांनी प्रतिपादन केले आहे. गेल्यावर्षी साखरेचे निव्वळ उत्पादन ३३९ लाख टन झाले होते. त्या व्यतिरिक्त ४३ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी झाला होता. मात्र यंदाच्या वर्षी ४० लाख टन साखर इथेनॉल निर्मीतीसाठी वळवल्यानंतर साखरेचे उत्पादन २९१.५० लाख टन इतकेच होण्याचा केंद्र शासनाचा अंदाज आहे.
राज्य निहाय ऊस उत्पादन आणि नवे साखर उत्पादन यावर दृष्टिक्षेप टाकता १७२ लाख टन ऊस गळीत करून १३.५० लाख टन नवे साखर उत्पादन घेऊन महाराष्ट्राने देशभरात आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील ११० कारखान्यांनी १४४ लाख टन ऊस गाळप करून १३ लाख टन नवे साखर उत्पादन घेतले आहे. तिसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक राज्यातील ७३ कारखान्यांनी १३० लाख टन ऊस गाळप करून ११ लाख टनाचे नवे साखर उत्पादन केले आहे. आता पर्यंतच्या सरासरी साखर उताऱ्यामध्ये मात्र उत्तर प्रदेशने ९.०५ टक्के उतारा घेऊन आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक राज्याचा सरासरी साखर उतारा ८.५० टक्के राहिला असून महाराष्ट्राला मात्र सरासरी साखर उतारा ७.८५ टक्के इतकाच मिळाला आहे. अर्थात थंडी सुरु झाल्यानंतर साखर उताऱ्यामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे.
इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ होण्याची अपेक्षा"केंद्र शासनाने इथेनॉलचे वर्ष १ नोव्हेंबर ते ३१ ऑक्टोबर करण्याचा निर्णय घेऊन सुद्धा नोव्हेंबर महिना सरला तरी इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ झाल्याचे नोटिफिकेशन अद्यापही काढलेले नाही. त्यामुळे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या बाबत आम्ही केंद्र शासनाच्या संबंधित मंत्रालयाशी पाठपुरावा केल्यानंतर असे सांगण्यात आले की इथेनॉलचे नवीन दर जाहीर होण्यात जरी विलंब झालेला असला तरी नवे दर १ नोव्हेंबर २०२३ नंतर पुरवठा केलेल्या इथेनॉलला लागू होतील" असे राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी म्हटले आहे.