प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामासाठी उपलब्ध होणारे सहा हजार रूपयांचे पेन्शन त्यांना वेळेत मिळवून देण्यासह त्यांच्या बँक खात्याची केवायसीची माहिती भरण्यासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी नेमण्यात येत आहेत. त्याच्याकडून रखडलेल्या रकमेसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम ४५ दिवसांत करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) ही केंद्र पुरस्कृत योजना खातेधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. या योजनेच्या निकषांप्रमाणे पात्र शेतकरी कुटुंबीयास रुपये दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे चार महिन्यांतून एकदा असे एकूण सहा हजार रुपये प्रति वर्ष लाभ मिळत आहे.
हप्त्याची रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार
- शेतकऱ्यांना ही रक्कम खते, बियाणे व औषधे आदीच्या खरेदी इतर गरजांसाठी कामी येत आहे. त्यासाठी मिळणाऱ्या पुढील १६ व्या हप्त्याची रक्कम या नोडल अधिकाऱ्याच्या माध्यमातून बँक खात्यात जमा कली जाणार आहे.
- ग्रामस्तरीय नोडल अधिकारी म्हणून कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक, सामाईक सुविधा केंद्र, प्रगतिशील शेतकरी, एफपीओ, एफपीसी यांची नेमणूक करण्यात येईल, असे कोकण विभागीय कृषी उपायुक्त अंकुश माने यांनी सांगितले.