माहूर तालुक्यातील कुपटी परिसरामध्ये ९० टक्के नागरिक शेती करतात. तालुक्यासह ग्रामीण भागातील नागरिकांची मुख्य उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. मात्र, आधुनिकतेच्या काळात शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाच्या साह्याने शेती करण्यास सुरुवात केल्यामुळे बैलजोडीवरील नांगर कालबाह्य झाले आहेत.
पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बैलजोडीने शेत नांगरणी केली जात असे. शेतीच्या पद्धतीमध्ये बैलाच्या साहाय्याने नांगरणीचे काम केले जायचे. मात्र, बदलत्या काळामध्ये शेती ही सर्वत्र यंत्राद्वारे केली जाते. नांगरणीपासून नांगराद्वारे शेतातील कानाकोपऱ्यातील मशागत ही बैलाच्या साह्याने केली जात होती. शेतीमध्ये बैलशक्तीचा वापर नांगरणी व वखरणी आंतर मशागतीसाठी केला जात होता.
शेतीमध्ये बैलचलित सुधारित अवजारे चालविल्यामुळे बैलांनादेखील वर्षभर काम मिळायचे. मशागतीच्या खर्चामध्येही बचत होत असे; मात्र, यांत्रिक युग असल्यामुळे यंत्रांकडे कल वाढला आहे. शेतीची मशागत म्हटली की नांगरणी, नांगर आणि बैलजोडी व त्यांना हाकणारे शेतकरी असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.
बैलाच्या जागी ट्रॅक्टर
बैलांची जागा आता ट्रॅक्टर व इतर यंत्रांनी घेतली आहे. परंतु, ट्रॅक्टरच्या टायरमुळे जमीन दबली जाते, असे काही शेतकरी सांगतात. आता मात्र या विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे बैलजोडीवरील लोखंडी नांगर हा कालबाह्य झालेला आहे.