पूर्वी शेतीच्या सर्वच कामांसाठी शेतकऱ्यांना बैलांवर अवलंबून राहावे लागत होते. रबीचा हंगाम संपताच बैलांच्या साहाय्याने शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग यायचा. ही कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागायचा.
शिवाय कठोर परिश्रमही लागत असे. मात्र, बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश शेतकरी नागरणी, कोळपणी, पेरणी यासह बरीच कामे आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने करताना दिसून येत आहेत. त्यामुळे बाजारात बैलांची विक्री वाढल्याचे दिसून येते.
शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या आधुनिक यंत्रांच्या तंत्रज्ञानात गेल्या काही वर्षांपासून मोठी भर पडली आहे. शेतीसाठी लागणारे विविध यंत्र आता बाजारात उपलब्ध आहेत, या यंत्रांच्या साहाय्याने शेतीची सर्व कामे कमी वेळेत होतात. शिवाय मजुरांची गरजही भासत नाही. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी गोठ्यातील बैल विक्रीला काढल्याचे दिसतेय.
यंदा जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने तीव्र पाणीटंचाई आहे. शेतीमालाला अपेक्षित भाव मिळाला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पेरणीसाठी खते, बी-बियाणे खरेदी करायची असल्याने बैलांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येते.
दुधाळ जनावरांची खरेदी वाढली
अलीकडच्या काळात दुग्धव्यवसाय पशुपालकांसाठी वरदान ठरत आहे. या व्यवसायातून अनेक शेतकरी समृद्ध झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळल्याचे दिसून येते. शेती ही नेहमीची तोट्याची ठरत असल्याने कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी पशुपालक बाजारात गाय, म्हैस आदी दुधाळ जनावरांची खरेदी करताना दिसून येत आहेत.
हेही वाचा - Organic Fertilizer गाजर गवतापासून या सोप्या पद्धतीने तयार करा दर्जेदार सेंद्रिय खत