Join us

नांगरणीतच खताचा भाव वाढला, शेती करायची कशी शेतकरी चिंतेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 10:20 AM

खताच्या प्रत्येक बॅग मागे ५० रुपयाची दरवाढ

पेरणी झाल्यानंतर पिकांची उगवण क्षमता चांगली व्हावी म्हणून अनेक शेतकरी पेरणी सोबत किंवा आठवडाभराच्या अंतराने रासायनिक खतांची मात्र देतात. शेतकऱ्यांकडे पैसे नसले तरी, उसनवारी करून हा होईना गरज पूर्ण करतात. यंदा पेरणी पूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीमध्ये सरासरी ५० रुपयांची वाढ झाली आहे.

शेती उत्पादनासाठी रासायनिक खतांच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावतात गेल्या दोन-चार वर्षांपासून सतत रासायनिक खतांची दरवाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडत आहे. सध्या शेतकरी मशागत करण्यात गुंतला आहे. खरीप पेरणी चालू झाल्यास खताचे भाव वाढणे किंवा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने शेतकरी येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची गरजेपूर्ती साठवणूक करत आहेत.

अनेक वेळा पेरणी झाल्यास शेतीसाठी लागणारे खत वेळेवर उपलब्ध होत नाही हे देखील साठवणूक करण्यामागील मुख्य कारण मानले जाते. जूनच्या पहिल्या आठवड्यातच मोसंबी बागा, ऊसपिकासाठी खतांची पुरेशा मात्रा देणे आवश्यक असते. त्यामुळे रासायनिक खतांची मागणी आतापासूनच होत आहे. यावर्षी खताच्या प्रत्येक बॅग मागे ५० रुपयाची दरवाढ झाली आहे.

असे आहेत सायनिक खताचे दर

  1. युरिया प्रति बॅग २६६
  2. डीएपी प्रति बॅग १ हजार ३५० रुपये
  3. महाधन २४२४ प्रति बॅग १ हजार ७०० रुपये
  4. सुफला १५१५१५ प्रति बॅग १ हजार ४७५

मागील खरीप हंगामापूर्वीच ५० रुपयाची वाढ झाली. दोन महिन्यांपूर्वी हेच रासायनिक खत ५० रुपये कमी किमतीने विक्री होत होते हे विशेष. 

मागील दोन वर्षापासून मालाचे हमीभाव फारसे वाढले नाहीत. बियाणे, खते, मजुरीचे दर वाढतच चालले आहेत. परंतु शेतमालाचा भाव स्थिर असल्याने शेती करणे परवडत नाही. सततची होणारी खतांची दर वाढ यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक भार सोसावा लागत आहे. - सुधाकर वाघ, शेतकरी

टॅग्स :खतेशेतीशेतकरीबाजार