Join us

देशात यंदा साखरचे उत्पादन कमी होण्याची शक्यता; पण कशामुळे?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 12:49 PM

देशात चालू गळीत हंगामात ३१६ लाख टन साखरचे उत्पादन होईल. गेल्या हंगामापेक्षा ते ४ टक्क्यांनी कमी असेल, असा पहिला अंदाज ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने (ऐस्टा) वर्तविला आहे. महाराष्ट्रात ९६ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता असून, राज्यातील गळीत हंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल, असेही ऐस्टाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : देशात चालू गळीत हंगामात ३१६ लाख टन साखरचे उत्पादन होईल. गेल्या हंगामापेक्षा ते ४ टक्क्यांनी कमी असेल, असा पहिला अंदाज ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने (ऐस्टा) वर्तविला आहे. महाराष्ट्रात ९६ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता असून, राज्यातील गळीत हंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल, असेही ऐस्टाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

गतवर्षी देशात ३२९ लाख टन साखरचे उत्पादन झाले होते. कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामान यामुळे देशात यंदा साखरचे उत्पादन कमी होण्याची शक्यता साखर कारखान्यांच्या संघटनांनी तसेच सरकारनेही वर्तविली आहे. ऐस्टाच्या अहवालातही गतवर्षीपेक्षा ४ टक्के कमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात इथेनॉलकडे वळविल्या जाणाऱ्या सुमारे २० लाख टन साखरचा समावेश नाही.

चालू हंगामाच्या सुरुवातीला देशात ५७ लाख टन साखर शिल्लक होती. ती आणि ३१६ लाख टन अशी ३७३ लाख टन साखर हंगामाअखेर उपलब्ध होणार आहे. देशाची गरज २९० लाख टन साखरची आहे. त्यामुळे हंगामाअखेर ८२ लाख टन साखर शिल्लक राहणार आहे.

अधिक वाचा: उत्पादन वाढविण्यासाठी सुरू उसाची शास्त्रीयदृष्ट्या लागवड कशी करावी?

उत्तर प्रदेशात सर्वाधिकचालू हंगामात उत्तर प्रदेशात ११७ लाख टन साखरचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गतवर्षीपेक्षा ते १० लाख ७० हजार टनांनी कमी असले तरी हे राज्य देशात साखर उत्पादनांत प्रथम क्रमांकावर राहणार आहे.

महाराष्ट्रात जादा उत्पादन शक्यमहाराष्ट्रात गतवर्षी १०७ लाख टन साखरचे उत्पादन झाले होते. यंदा ते ९६ लाख टनवर येणार असले तरी बिगर हंगामी झालेल्या पावसाने उसाचा उतारा वाढत आहे. तसेच ऊसतोड मजुरांची संख्या कमी असल्याने गाळप हंगाम लांबून सुरू उसालाही पक्व होऊन गाळपास पाठविता येणार असल्याने हे उत्पादन यापेक्षा अधिक होण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ४७ लाख टन साखर उत्पादन करून तिसऱ्या क्रमांकावर राहणार आहे.

हंगामाच्या प्रारंभी वर्तविलेल्या अंदाजात १५ ते २० टक्के बदल होऊ शकतो. त्यामुळे चालू हंगामात झालेले साखर उत्पादन, शेतात उभ्या असलेल्या उसाचे क्षेत्र याचा आढावा घेऊन जानेवारी महिन्यात ऐस्टा आपला साखर उत्पादनाचा पहिला अंदाज वर्तविते. या अंदाजात तीन टक्के कमी जास्त असा फरक पडू शकतो. हंगामाअखेर ८२ लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. - प्रफुल्ल विठलानी, अध्यक्ष, ऐस्टा

टॅग्स :ऊससाखर कारखानेमहाराष्ट्रपाऊसहवामानकर्नाटकउत्तर प्रदेश