Join us

रानटी हत्तींचा उच्छाद! शेतकऱ्याला आपटून चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 2:00 PM

गडचिरोलीतील घटना

शेतात आलेल्या रानटी पांगविण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांपैकी शेतकऱ्याला रानटी हत्तीने सोंडेने उचलून खाली आपटले. त्यानंतर त्याला पायाखाली चिरडून ठार केले. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात दिभना शिवारात घडली.

होमाजी गुरनुले (५५, रा. दिभना) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दिभनापासून दोन किमी अंतरावरील शेतशिवारात रानटी हत्ती आल्याची माहिती दिभना गावात मिळाली. त्यानुसार होमाजी गुरनुले हे अन्य एका शेतकऱ्यासोबत रात्री ८ वाजेच्या सुमारास कळपाला जंगलाच्या दिशेने पांगवण्यासाठी गेले होते. रानटी हत्तींना शेतातून जंगलाच्या दिशेने पांगवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु शेतात सर्वत्र हत्ती पसरले होते.

पीक कापणीच्या हंगामातच रानटी हत्तींची दहशत

कळपातीलच एका हत्तीने होमाजी गुरनुले यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी एका झाडाचा आडोसा घेतला; परंतु चवताळलेल्या हत्तीने होमाजी यांना सोंडेने उचलून जागीच आपटले व त्यानंतर चिरडले. यात होमाजी गुरनुले हे जागीच ठार झाले तर सोबतचा शेतकरी आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाला.

ओडिशा, छत्तीसगडवरून आलेल्या रानटी हत्तीने जिल्ह्यात धूमाकूळ घातला आहे. शेती व्यवसाय पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे कधी फुटून अदृश्य होईल, हे सांगणे कठीण आहे. शेतकरी पक्षी, उंदीर, घूस, मुंगी, किडे, माकोडे, रानटी डुक्कर, जैविकांचे जीव जगवत आला आहे. नैसर्गिक वादळ वारा गारपिटीसह अकाली पाऊस तर कधी कोरडा दुष्काळ हे नित्याचेच असतांना रानटी हत्तीचे जहाजाएवढे पोटही शेतकऱ्याने भरायचे. ही विषयाची परीक्षा आहे. वनविभाग केवळ पंचनामे करण्याचे काम करीत आहेत.

वनविभागाविरोधात रोष

या भागात आठ दिवसांपासून रानटी हत्ती ठाण मांडून आहेत, पण, वन विभागाने योग्य ती सतर्कता बाळगली नाही. शेतकरीच हत्तींना जंगलाच्या दिशेने पांगविण्यासाठी गेले होते. रात्री ९:३० वाजता घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पंचनामाची कार्यवाही झाली. वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला.

टॅग्स :शेतकरीशेतीगडचिरोली