सहकार विभागाने यंदाच्या ऊस गाळप हंगामातील साखरेच्या उताऱ्यानुसार एफआरपीचे दर निश्चित केले आहेत. यात पुणे व नाशिक विभागासाठी १०.२५ आधारभूत उतारा निश्चित केला असून यासाठी ३,१५० रुपये तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभागासाठी ९.५० टक्के साखर उतारा निश्चित केला असून त्यासाठी २,९९१ रुपये एफआरपी दर ठरवण्यात आला आहे.
गाळप हंगाम संपल्यानंतर साखर उतारा, उपपदार्थ विक्रीतून प्राप्त झालेली रक्कम आदींचा ताळेबंद साखर आयुक्तांना सादर केल्यानंतर एफआरपीचे अंतिम दर निश्चित होणार आहेत. गाळप हंगाम संपल्यानंतर साखर उतारा निश्चित करून दुसरा हप्ता देण्यासंदर्भात याआधीच राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपीच्या तुकड्याला विरोध केला असला तरी साखर आणि उपपदार्थ विक्रीतून अंतिम ऊस दर ठरविण्याचे सूत्र स्वीकारल्याने दुसऱ्या टप्प्यात साखर कारखान्यांनी अंतिम दर ठरवणे अपेक्षित आहे.
कशी ठरते एफआरपी?
केंद्र सरकार प्रत्येक वर्षी गाळप हंगाम सुरू करण्याआधी नवीन हंगामात कोणत्या दराने किमान एफआरपी द्यायची याबाबत अधिसूचना जारी करते. त्यानुसार १०.२५ %
उताऱ्यासाठी ₹ ३,१५० तर ९.५०% उताऱ्यासाठी ₹ २,९९१ दर निश्चित करण्यात आला आहे. हा दर कारखान्याच्या गेटजवळ आणून दिलेल्या उसासाठी निश्चित करण्यात येतो. उत्तर प्रदेश सह अन्य राज्यात उसाची तोडणी व वाहतूक कारखान्यांमार्फत केली जात नाही. मात्र, महाराष्ट्रात साखर कारखाने तोडणी आणि वाहतूक करत असतात. त्यामुळे राज्यात केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या एफआरपी दरांमधून ऊस तोडणी व वाहतुकीसाठी ऊस पुरवठादारांच्यावतीने केलेला खर्च वजा केला जातो.