सचिन ठाकर
पवनानगर : फेब्रुवारीत साजऱ्या होणाऱ्या 'व्हॅलेंटाइन डे' आणि प्रेम सप्ताहासाठी जगभरातील तरुणाई सज्ज झाली आहे. या प्रेमोत्सवासाठी मावळ तालुक्यातील गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी आहे.
यंदा मावळातून एक कोटीवर गुलाबाची फुले बाजारात जातील, असा अंदाज आहे. जगभर पसरणारा मावळातील गुलाबाचा दरवळ येथील फूल उत्पादकांना 'अच्छे दिन' दाखवेल, असे चित्र आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळमधील गुलाबाच्या मळ्यांतून जपान, ऑस्ट्रेलिया, दुबईसह अरब राष्ट्र, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, युरोपच्या बाजारात गुलाब पाठवले जात आहेत.
अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यात वाढ होत आहे. अनेक तरुण उत्पादक शेतकऱ्यांनी पॉलीहाऊस, ग्रीनहाऊसमध्ये गुलाब फुलवले आहेत.
व्हॅलेंटाइन 'डे' (१४ फेब्रुवारी) आठवड्यावर येऊन ठेपला आहे, तर प्रेमाचा हा उत्सव त्याआधी आठवडाभर सुरू असतो. मावळातील गुलाबांचा लौकीक जगभर आहे.
दर्जा व टिकाऊपणाच्या कसोटीवर ती उत्तीर्ण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही ही फुले जातात. यंदा मावळातून ३० ते ३५ लाख फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होणार आहे.
७० लाख गुलाबाची फुले स्थानिक बाजारपेठेमधून निर्यात होणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
असा मिळतो भाव
स्थानिक बाजारपेठ - १५-१७
जागतिक बाजारपेठ - १४-१५
व्हॅलेंटाइन 'डे'साठी या जातींना आहे अधिक मागणी
● व्हॅलेंटाइन 'डे'ला मावळातील 'डच फ्लॉवर' प्रजातीतील लाल रंगाच्या टॉप सिक्रेट, बोरडेक्स, फॅशन, सामुराई, श्रीनगला, फस्टरेड, गोल्डस्ट्राइक, गुलाबी रंगाच्या रिव्हायव्हल, पॉईजन, ऑरेंज रंगाच्या ट्रॉफीकल अमेजॉन, झाकिरा या फुलांना दर्जा व टिकाऊपणामुळे अधिक मागणी असते.
● जपान, हॉलंड, थायलंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनीसह पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू या स्थानिक बाजारपेठेतही गुलाबाला मागणी असते. त्यासाठी फुल उत्पादकांची तयारी सुरू आहे.
खते, औषधांच्या किमतीसह मजुरीच्या दरातही खूप वाढ झाली आहे. शासनाने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करावी. परदेशात माल पाठविण्यासाठी वाहतूक खर्च वाढला आहे. गुलाब फुलांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा परदेशात कमी दर मिळत असल्याने स्थानिक बाजारपेठेत जास्तीत जास्त माल पाठवला जात आहे. - अमित विजय ठाकर, फूल उत्पादक
यावर्षी गुलाब फुलांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे उत्पादन वाढीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर राबत आहे. - सतीश मोहोळ, अध्यक्ष, जय मल्हार फूल उत्पादक संघ