सांगली : जिल्ह्यातील २०२३-२४ मधील ऊस गळीत हंगाम संपला असून, १७ कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ८७ लाख ११ हजार ४०८ टन उसाचे गाळप करून ९७ लाख ८३ हजार २३९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी उतारा ११.२३ टक्के आहे.
जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी आटपाडीतील माणगंगा आणि कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला नाही. उर्वरित १७ कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला होता. ऊस उत्पादकांचे आंदोलन आणि ऊसटंचाईवर मात करीत कारखान्यांनी गळीत हंगाम यशस्वी पूर्ण केला.
बहुतांशी कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या बंद झाला आहे. जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी ८७ लाख ११ हजार ४९८ टन उसाचे गाळप करून ९७ लाख ८३ हजार २३९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.
सर्वाधिक गाळप क्रांती कारखान्याने, तर सर्वांत कमी गाळप नागेवाडी, ता. खानापूर येथील यशवंत शुगर अॅण्ड पॉवर कारखान्याने एक लाख ३७ हजार १३३ टन उसाचे गाळप केले आहे.
सांगलीतील दत्त इंडिया कारखान्याने गतवर्षी दहा लाख टनांहून अधिक गाळप केले होते यावर्षी सात लाख ९१ हजार ९५५ टन उसाचे गाळप करून आठ लाख ९३ हजार ५७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
सोनहिरा कारखान्याने दहा लाख ४४ हजार ३६५ टन उसाचे गाळप करून ११ लाख ५७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखन उतारा १२.०२ टक्के राहिला आहे.
गळीत हंगामात 'क्रांती'च अव्वल
कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड साखर कारखान्याने या गळीत हंगामात विक्रमी १० लाख ६२ हजार ७६० टन उसाचे गाळप करून ११ लाख ४२ हजार ६१० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखर उतारा ११.८८ टक्के राहिला आहे.
साखर उताऱ्यात राजारामबापू आघाडीवर
राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या वाटेगाव युनिटने जिल्ह्यात सर्वाधिक १२.६२ टक्के साखर उतारा घेतला आहे. सर्वात कमी ८.५५ टक्के साखर उतारा एसजीझेड अॅण्ड एसजीए शुगर्स तासगाव कारखान्याचा आहे.