सध्या बाजारात गव्हाचे पीठ प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांत मिळत आहे. केंद्र सरकारने 'भारत आटा'च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करीत मंगळवारपासून या पिठाची ३० रुपयांत विक्री सुरू केली आहे. या टप्प्यात तांदूळही प्रतिकिलो ३४ रुपये या दराने विकले जाणार आहेत.
केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली की, सर्वसामान्यांना रोजच्या आहारात लागणारे तांदूळ, डाळी, गव्हाचे पीठ परवडणाऱ्या दरात मिळावे यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.
किरकोळ विक्रीमध्ये सरकारने थेट हस्तक्षेप केल्याने किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळणार आहे. भविष्यात गरज पडल्यास आणखी गहू आणि तांदळाचा पुरवठा सरकारी संस्थांना केला जाणार आहे.
संस्थांना किती टन गहू आणि तांदूळ दिला?
■ भारत आटाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारने या संस्थांना ३.६९ लाख टन गहू आणि २.९१ लाख टन तांदूळ उपलब्ध करून दिला आहे.
■ पहिल्या टप्प्यासाठी १५.२० लाख टन गहू आणि १४.५८ लाख टन तांदूळ उपलब्ध करून दिला होता.
कुठे विक्री होणार?
ही विक्री केंद्रीय भांडार, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघांची (एनसीसीएफ) दुकाने तसेच मोबाइल व्हॅनमधून केली जाणार आहे. गव्हाचे पीठ आणि तांदळाची पाच व दहा किलोच्या पाकिटांमध्ये विक्री केली जाईल.