पूर्वी पिकांची राखण म्हटलं की, गोफण असायची. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात माचावर उभे राहून गोफणीने दगड मारून पाखरांना हुसकावून लावण्याचे काम शेतकरी करत. तोंडाने काढलेला सुमधुर आवाज वातावरणात उत्साह निर्माण करीत असे. काळानुसार गोफण काळाच्या पडद्याआड गेली. त्यानंतर पाखरांना परावर्तित करणारी प्लास्टिक पट्टी आली. काही काळानंतर ती गायब होऊन भोंगे आले आहेत.
बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव परिसरात यंदा पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. परंतु काही शेतकऱ्यांना थोडेफार पाणी असल्याने उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. पीक जोमात आले असून कणसांना दाणे भरले आहेत. परिसरात इतर कुठेही बाजरी नसल्याने पक्षी कणसातील दाणे टिपण्यासाठी घिरट्या घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजरीची राखण करावी लागत आहे. पिकातील पक्षी हटवण्यासाठी शेतकरी भोंग्याचा वापर करत आहेत.
भोंग्यामध्ये विविध प्रकारचे आवाज रेकॉर्ड करून पाखरे हाकलता येतात. पाखरांना घाबरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज रेकॉर्ड करण्याची त्याच्यामध्ये सोय आहे. भोंग्यांमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि त्रासही कमी होतो, असे शेतकरी विष्णू खेडकर, रावसाहेब खेडकर यांनी सांगितले. दरम्यान, काही शेतकरी भोंग्यामध्ये कुत्र्याचा आवाज रेकॉर्ड करून रात्री आपल्या शेतामध्ये, झाडावर लटकवून ठेवतात. त्यामुळे रानडुक्कर, हरिण, ससे या प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण होते, असे राहुल खेड़कर यांनी सांगितले.
हेही वाचा - गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने