नाशिकमध्ये सुरु असलेल्या जागतिक कृषी महोत्सवात पाच जोडप्यांची लग्नगाठ बांधली असून नव्या संसाराला सुरवात झाली आहे. या जोडप्यांचे कन्यादान करत त्यांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कृषी महोत्सवाच्या माध्यमातून अनेकांचे संसार फुलण्यास मदत झाली झाल्याचे पाहायला मिळाले.
दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील डोंगरे वसतिगृह येथे जागतिक कृषि महोत्सव सुरू आहे. या कृषि महोत्सवात वधु वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या उपवर वराचा वधूचा परिचय त्यांनी करून दिला. यावेळी पाच नवदांपत्यांचा विधिवत विवाह सोहळा संपन्न झाला. कन्यादान योजनेअंतर्गत दानशूर नागरिकांकडून नवविवाहित वधू वरांना भांडी, कपडे व इतर साहित्य देण्यात आले. यात विशाल विलास कडू व ज्योती सुभाष भोये, अक्षय गोरख लबडे आणि पूजा सुनील जाधव, शुभम देविदास पोटे आणि अश्विनी मारुती रणदिवे, सुरज दिगंबर कदम आणि धन्वंतरी दिलीपराव हिवराळे, दीपक पांडुरंग सांगळे आणि मुक्ता कैलास मोरे यांचा या ठिकाणी विवाह संपन्न झाला.
यावेळी विवाह समुपदेशक कांचन यादव म्हणाल्या की, सर्वांना काही मिळत नसते. ही जाणीव वैवाहिक बाबतीत ठेवल्यास वैवाहिक जीवन यशस्वी होते. त्याचप्रमाणे घरातील वडीलधाऱ्या माणसांना जपायला शिकला पाहिजे. ती जपणूक केली तर समज आल्यानंतर आपल्या पाल्याला त्याच्या वैवाहिक जीवनात प्रवेश करण्यासाठी विवाह संस्कार व मुलीकडे मुलीसाठी मातृत्वाच्या माध्यमातून आईने योग्य समज देऊन आपल्या मुलीचा व मुलाचा संसार बिघडणार नाही, या दृष्टीतून काळजी घेऊन माणसं झोपायला शिकली पाहिजे, लग्न जुळवणे सोपं असतं, परंतु त्याची आयुष्यभर गाठ टिकवणे ही मोठी कसरत असते. त्यामुळे संयम व सहनशीलता ही दोघांकडे असणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात मतभेद झाल्यास योग्य समन्वयक किंवा मध्यस्थामार्फत त्यात योग्य चर्चा करून योग्य मार्ग काढणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
शाश्वत शेती समजून घ्या...
तसेच शिक्षण तज्ञ संचालक प्रशांत बोराडे म्हणाले की, शाश्वत शेती समजून घेतल्यास शेतीला येणारा भविष्यकाळ निश्चित चांगला आहे. शेतीकडे किंवा शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा हे जर सूत्र अंगिकारले तर संपत्ती व समाधान हे मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण असणार नाही. तसेच कृषी महोत्सवात विनामूल्य उपवर वधू-वरांची नोंदणी अतिशय सुखावह बाब असल्याचे ते म्हणाले. वैवाहिक जीवनामध्ये वधूच्या वाढत्या अपेक्षामुळे व त्या प्रत्यक्षात न उतरल्यामुळे पर्यायी कुटुंबात अंतर्गत कलह वाढतात, यासाठी समुपदेशन होणे हे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.