Join us

कालव्याचे पाणी पाझरून शेतातील उभी पिके अति पाण्याने धोक्यात, शेतीपिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 11:00 AM

नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील शिंदवड गावात कॅनॉलचे पाणी त्वरित बंद करण्याची मागणी..

नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील शिंदवड या गावातून ओझरखेड कॅनॉल असून, मागील पंधरा दिवसांपासून हा कॅनॉल दुथडी भरून वाहत आहे. परंतु कॅनॉल शेजारील शेतकरी मात्र संकटात सापडला असून, कॅनॉलचे पाणी आजूबाजूच्या शेतात झिरपून शेतातील उभी पिके अति पाण्याने धोक्यात आली आहेत. कॅनॉलचे पाणी त्वरित बंद करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अगोदरच दुष्काळात लावलेले टोमॅटो दर नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना त्यात आणखी भर पडली आहे. शिंदवड येथे ओझरखेड सुकत आहेत. कॅनॉलचे पाणी पाझरत असल्यामुळे टोमॅटो पिकामधून पाणी वाहत आहे. त्यामुळे अति पाण्यामुळे टोमॅटो सुकत आहेत. याबाबतचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिंडोरीला आले असता त्यांना परिसरातील शेतकऱ्यांकडून देण्यात आले असून, या संबंधीचे निवेदन जलसंपदा विभागालादेखील देण्यात येणार आहे.

१. सध्या द्राक्ष हंगाम सुरु झाला असून, घड कमकुवत निघताना दिसत आहेत आणि ते वाचवण्यासाठी शेतकरी फवारणी करत आहेत; पण सततचा ओलावा असल्याने घड जिरण्याचे प्रमाण वाढत आहेत. कॅनॉलच्या पाण्यामुळे ट्रॅक्टर चिखलात अडकत आहे. कॅनॉलचे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, कालवा फुटतो की काय, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

२. भगीरथ बस्ते यांच्या मळ्याजवळ कालव्यातून पाणी बाहेर पडायला फक्त ७ इंच इतकाच फरक दिसून आला. अशा अनेक अडचणी सध्या शेतकऱ्यांसमोर असून, लवकरात लवकर पाणी बंद करण्याची मागणी शिंदवड व परिसरातील शेतकरी करत आहेत.

टॅग्स :पीकपाणीशेतकरी