राजुरी: साधारणतः दिवाळीच्या सुमारास खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी करून ते शेतकऱ्यांच्या घरात येते. गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना त्यावेळी सोयाबीन विकून टाकले, पण बऱ्याच शेतकऱ्यांनी भविष्यात भाववाढ होईल, या आशेने सोयाबीन साठवून ठेवले आहे.
मात्र, तीन ते चार महिने झाले, तरी बाजारभाव जैसे थे असल्याने सोयाबीनच्या दराचे काय होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. परिणामी जुन्नर तालुक्यातील बळीराजा भाववाढीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
जुन्नर तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामातील शेती कामाकडे वळला आहे. अधिकाधिक उत्पादन कसे घेता येईल याचे नियोजन करणे सुरू आहे. मात्र, शेती करण्यासाठी हाताशी पैसे असणे गरजेचे आहे.
यासाठी शेतकरी बियाणे, खते, औषधे यांची तजवीज करण्यासाठी सारखे धडपड करत असतो. हक्काचा आर्थिक स्त्रोत शेतकरी वर्गाला नसतोच. शेतीमधून जे उत्पादन होईल, त्याच्या विक्रीतून त्यांना दोन पैसे मिळतात.
सध्या शेतकरी सोयाबीन नाईलाजाने विक्रीसाठी बाजारात आणत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु,म्हणावा असा बाजारभाव मिळत नाही, याचा मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी जून, जुलै महिन्यांत सोयाबीनचे दर १० हजार रुपये क्विंटलच्या घरात होते.
यामुळे यावर्षी देखील सोयाबीनच्या दरात चांगली तेजी राहील, या विचाराने काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबविली. परंतु, सध्या सोयाबीन बाजारभाव ५० किलोच्या पुढे गेलेले नाहीत. पुढील काळात सोयाबीनचे दर वाढण्याचे कोणतेही संकेत नाहीत.
त्यामुळे मिळेल त्या भावात शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी काढले आहे. बाजारात दरवाढीच्या आशेने व बियाण्यासाठी काही शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवली होती. पण, अधिक काळ सोयाबीन ठेवल्याने ही तूट येते. यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन देखील विक्रीसाठी काढले आहे.
पदरी निराशाच
यंदा अल्प पावसामुळे सोयाबीन पिकाची फारशी वाढ झाली नाही. रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट झाली. दुसरीकडून मालाला भावही कमी राहिल्याने यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन फारसे फायद्यात राहिले नाही. कीटकनाशके, मशागत आणि शेतमजुरीचे वाढलेले दर पाहता सोयाबीनने शेतकऱ्यांना फार काही हाती लागू दिलेले नाही. सोयाबीनची काढणी होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला, तरी सोयाबीनच्या दरात वाढ होत नाही.
मागील वर्षीचे १० क्विंटल सोयाबीन याच महिन्यात विकले, तेव्हा बाजारभाव ७० ते ८० किलो भाव मिळाला. सोयाबीनचे भाव वाढेल. या आशेवर थांबलो. परंतु, आता नवीन हंगामासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे मिळेल त्या भावात विकावे लागले. - राहुल मते, सोयाबीन उत्पादक