फयान वादळानंतर विस्कटलेले ऋतुचक्र अजूनही सरळ झालेलेच नाही. त्या पाठोपाठ आलेले निसर्ग, तौक्ते या वादळांनी हवामानातील बेभरवशीपणा वाढवला. याचा खूप मोठा परिणाम आंबा पिकाला भोगावा लागत आहे.
गेल्या २५ वर्षांत जिल्ह्यात ४५ हजार हेक्टर क्षेत्रात सुमारे ५० लाख हापूसची लागवड झाली. मात्र, हवामानातील बेभरवशीपणाने हापूसच्या झाडावरील टांगती तलवार कायम आहे.
यंदा आंबा चांगला नाही, हे वाक्य गेली अनेक वर्षे सातत्याने बोलले जाते. ज्यांच्या या व्यवसायाशी संबंध नाही, त्यांना ही दरवर्षीची रडकथा वाटते, पण ज्यांनी हा व्यवसाय जवळून पाहिला आहे, त्यांना बागायतदारांच्या जीवाची रोजची घालमेल माहिती असते.
आज थंडी अधिक, आज ढगाळ वातावरण, आज कुठे पाऊसच पडला, आज उन्हाचा कहर अचानक वाढला, आज सोसाट्याचा वारा सुटला... अशी एक ना दोन असंख्य संकटे मोहोर येण्याआधीपासून शेवटचा आंबा झाडावरून काढेपर्यंत रोज बागायतदारांना छळतात.
ही सगळी कारणे आहेत नैसर्गिक. एक तर ती आपल्या हातातील नाहीत आणि दुसरे म्हणजे त्यावर जे उपाय आहेत, ते बागायतदारांना अधिकच खड्यात नेणारे आहेत. म्हणूनच हापूस लागवडीवरील धोक्याची टांगती तलवार कायम आहे.
या वर्षी पौष महिन्याच्या आधी भरपूर मोहोर आला. या मोहोराला खरं तर आंबा लागवड अधिक होते. त्यामुळे नोव्हेंबरला फवारण्या अधिक केल्या गेल्या, पण दुर्दैवाने यात नर मोहोराचे प्रमाण अधिक होते. त्याला फलधारणा खूपच कमी झाली.
फांदीच्या टोकाला असलेली छोटी कैरी गळून गेली. फलधारणा न झालेला मोहोर वाळला आणि तेथे पुन्हा मोहोर आला. त्यामुळे हंगाम लांबला. गतवर्षी फेब्रुवारीच्या अखेरपासून मुबलक आंबा हाती येण्यास सुरुवात झाली होती.
या वर्षी ती मार्च अखेरीला होईल. हे खूप मोठे नुकसान आहे. सद्यस्थितीत झाडावर असलेले फळ अत्यल्प आहे. आता येत असलेल्या मोहोराला किती फलधारणा होईल, याची खात्री नाही.
महाशिवरात्रीपर्यंत वातावरण बदलते असल्याने कीडरोगाचा धोका अधिक असतो. त्यापुढील हंगाम कितीसा फायदेशीर असेल, हे आताच सांगणे अवघड आहे. असे मत आंबा बागायतदार आनंद देसाई व्यक्त करतात. हवामानातील सततचे बदल, कीडरोग आणि महागडी औषधे, यामुळे हा व्यवसाय अनेकांना नकोसा झालाय.
● तापमानवाढीचे धोके
हवामानातील बदल हा जागतिक चिंतेचाच विषय आहे. त्याचा सर्वांत मोठा परिणाम शेती, फलोत्पादनावर होत आहे. आंबा पीक पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे हवामानातील बारीकसे बदलही आंब्यासाठी हानिकारक ठरतात. आताच्या हंगामात तापमानात झालेली मोठी वाढ हा सर्वांत मोठा धोका ठरत आहे.
● महिनाभर आधी उन्हाळा
कोकणात दरवर्षी शिमग्यामध्ये म्हणजेच साधारण १५ मार्चनंतर कडक उन्हाळा सुरू होतो. तोपर्यंत थंडीचे प्रमाण कमी झाले तरी तापमान वाढत नाही. यंदा मात्र फेब्रुवारीच्या मध्यावरच दुपारच्या वेळेत कडक ऊन पडत आहे. ते आंब्यासाठी हानिकारक आहे.
● मोहर आलाच नाही
फेब्रुवारी महिन्यातही हवेत थोडा थंडावा असल्याने मौहर येतो. त्यातही नवीन झाडांना याच काळात मोहर येतो. मात्र यावर्षी तापमान महिनाभर आधीच वाढल्यामुळे नव्या झाडांना मोहर आलाच नाही. तापमानातील हा बदल केवळ आंबाच नाही तर इतर क्षेत्रांवरही परिणाम करणारा आहे.
● क्षमतेइतका आंबा अनेक वर्षांत नाही
जिल्ह्यातील आंबा लागवडीचे प्रमाण पाहता चांगले आंबा पीक आले तर एक ते सव्वा लाख टन आंबा तयार होतो. त्यातील ६० हजार टन आंबा बाजारात थेट विक्रीसाठी जातो. २० हजार टन आंब्यावर स्थानिक पातळीवरच प्रक्रिया होते आणि ३० हजार टन आंबा प्रक्रियेसाठी बाहेर जातो. मात्र या क्षमतेइतका आंबा गेल्या अनेक वर्षात आलेला नाही.
● यंदा पाणीटंचाईचे संकट तीव्र होणार
मार्चमध्ये जाणवणारी उन्हाची तीव्रता आता फेब्रुवारीच्या मध्यावरच जाणवू लागली आहे. या कडक उन्हामुळे जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने घटेल आणि त्यामुळे झाडांना पाणी कमी पडेल. केवळ झाडांबाबतच नाही तर पाणीटंचाईची ही तीव्रता सर्वत्र जाणवू शकते. ही फार त्रासदायक बाब ठरणार आहे, अशी माहिती जाणकार देत आहेत.
● बागायतदार संकटात
यावर्षी मात्र, बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. हंगामाच्या प्रारंभी आंबा पिकाला पोषक वातावरण असल्याने बागायतदार चितामुक्त होता. परंतु, पहाटे थंडी आणि दुपारी कडक ऊन अशाप्रकारे बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसला. पिकाला पोषक वातावरण नसल्याने मोठ्या प्रमाणात फळांची गळती झाली आहे. हातचे पीक वाया गेल्याने बागायतदार संकटात सापडला आहे.
फयान वादळ येण्यापूर्वी आंब्याचे स्वतःचे असे वेळापत्रक होते आणि आता ते पूर्णपणे विस्कटले आहे. प्रत्येक दिवस मनात धाकधूक घेऊनच उगवतो. सलग सात महिने ही भीती कायम राहते. - आनंद देसाई, पावस
- मनोज मुळ्ये
रत्नागिरी