ऊस आणि साखर उत्पादनातील घट टाळण्यासाठी कर्नाटकने यंदाचा गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीही फारशी वेगळी नसल्याने तो १५ नोव्हेंबरला सुरू व्हावा असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील गळीत हंगाम राज्य सरकारच्या निर्णयानुसार १५ ऑक्टोबरच्या आसपास सुरू होतो. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. गतहंगामापेक्षा उसाची उपलब्धता १५ ते २० टक्क्यांनी कमी आहे. पाऊस कमी असल्याने उसाची वाढ म्हणावी तशी झालेली नाही, पूर्ण वाढ झालेला ऊस गाळपाला गेला तरच त्याचे वजन आणि उतारा दोन्ही चांगले येते. हंगाम किमान चार महिने किंवा त्यापेक्षा जास्त चालला तर ते कारखान्यांनाही फायदेशीर असते.
यंदा हा हंगाम ९० ते १०० दिवसच साखर कारखानदारांचा अंदाज आहे. ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू केल्यास अपरिपक्व ऊसही कारखान्यांना गाळपास आणावा लागेल, परिणामी ऊसाचे वजन कमी भरून शेतकऱ्यांचे, तसेच उतारा कमी आल्याने कारखान्यांचेही नुकसान होईल. १५ नोव्हेंबरला हंगाम सुरू झाल्यास ऊसतोड मजुरांची टंचाईही जाणवणार नाही असे या उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मंत्री समितीच्या बैठकीत होणार निर्णयऊस दरासंदर्भातील मंत्री समितीची बैठक १५ सप्टेंबरच्या आसपास बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये गळीत हंगाम कधी सुरु करायचा याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात ९४० लाख टन ऊस उपलब्धराज्यात २०२२-२३ च्या हंगामात २०५४ लाख ७५ हजार टन ऊस उपलब्ध होता. नव्या हंगामासाठी ९०० ते १४० लाख टनादरम्यान ऊस उपलब्ध आहे. यामुळे साखरेचे उत्पादनही घटणार आहे.
उसाची पळवापळवी शक्यराज्याची ऊस गाळपाची क्षमता प्रतिदिन नऊ लाख टनांवर गेली आहे. यामुळे हंगामात १३०० लाख टन उसाची गरज आहे. मात्र, ९४० लाख टनापर्यंतच ऊस उपलब्ध असल्याने कारखान्यांना उसाची टंचाई जाणवेल. त्यातून स्पर्धा निर्माण होऊन उसाची पळवापळवीही होण्याची शक्यता आहे.
साखर आयुक्तालयात झालेल्या बैठकीत कारखानदारांनी हंगाम उशिरा सुरु करण्याची मागणी केली आहे. तिची दखल राज्य सरकार घेईल अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास साखर कारखाने अडचणीत आल्याशिवाय राहणार नाहीत. - पी. जी. मेढे, साखर उद्योगातील तज्ज्ञ
गळीत हंगाम दिवाळीनंतर सुरु करणे हे सर्वांच्या दृष्टीने हितावह आहे. मात्र, ज्या भागात पाणीटंचाई आहे. तेथे पाऊस झाला नाही तर उस पिकाचे मोठे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरीवर्गातूनच गळीत हंगाम लवकर सुरु करण्याच्या मागणीचा रेटा येऊ शकतो. अशा परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा याचा विचार १५ ऑक्टोबर दरम्यानच होणे योग्य होईल असे वाटते. - विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ