Join us

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिले नाहीत.. राज्यातील या चार साखर कारखान्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:52 AM

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येकी दोन साखर कारखान्यांवर आरआरसीची (एफआरपीची रक्कम दिली नाही) कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे.

सोलापूर : शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येकी दोन साखर कारखान्यांवर आरआरसीची (एफआरपीची रक्कम दिली नाही) कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पाच व धाराशिवच्या एका कारखान्यांवर यापूर्वीच कारवाई केली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील लोकमंगल माउली साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाचे ५ कोटी ३८ लाख, वाशी तालुक्यातील भीमाशंकर शुगर मिल्सकडे ६ कोटी ८९ लाख, सोलापूर जिल्ह्यातील दि सासवड शुगर माळीनगर या कारखान्यांकडे १५३ कोटी, तर जय हिंद शुगर आचेगाव या कारखान्यांकडे ७८८ लाख रुपये थकबाकी आहे.

गाळप उसाचे १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करणे बंधनकारक असताना हंगाम बंद होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. सोलापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या अहवालावरून साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी या चार कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली आहे.

सरलेल्या हंगामात शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या जिल्ह्यातील विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव, विठ्ठल रिफायनरी करमाळा, मातोश्री लक्ष्मी शुगर, अक्कलकोट, सहकार शिरोमणी वसंतराव काळे, पंढरपूर, आदिनाथ करमाळा व धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी साखर कारखान्यांची आरआरसी साखर आयुक्तांनी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांनीही शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिले नाहीत. मात्र साखर सहसंचालकांना खोटी माहिती देऊन कारवाई थांबवली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.

१५ टक्के व्याजासह रक्कम द्याकारखान्यांकडे शिल्लक असलेली बँकेला तारण न दिलेली साखर तसेच बगॅस मोलॅसिस विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे १५ टक्के व्याजासह देण्यात यावेत, असे साखर डॉ. खेमनार यांनी आदेशात नमूद केले आहे.

अधिक वाचा: साखर उद्योगातील पारितोषिके जाहीर, हा कारखाना ठरला देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीसरकारराज्य सरकारसोलापूरउस्मानाबाद